
पुणे (Pune) : वारज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सांडपाणी वाहिनीतून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची गळती होत असून या ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर दूषित पाणी साचले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना या दूषित पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
मार्गक्रमण करताना वाहनांच्या वेगामुळे हे सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. या सांडपाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी या वाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
वारजे-माळवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे या परिसरांतून कामानिमित्त शहराकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिक या चौकातूनच प्रवास करतात. साहजिकच लाखभर लोकांचा नियमित प्रवास होत असल्याने, हे मोठे वर्दळीचे ठिकाण झाले आहे. मात्र येथील वाहिनीतून होत असलेल्या सांडपाण्याच्या गळतीमुळे या सर्व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मागील आठ दिवसांपासून हे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे या सांडपाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहने घसरत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहेस. ही सांडपाणी वाहिनी बदलून येथे मोठ्या व्यासाची वाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देऊन वाहिनीची त्वरित दुरुस्ती करून या परिसरात डासप्रतिबंधक औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे.
वारजे भागातील सांडपाणी वाहिन्यांची नियमित सफाई चालू आहे. वाहिन्यांमध्ये घुशींमुळे माती, दगड मोठ्या प्रमाणात भरले गेले आहे. संबंधित वाहिन्यांची पाहणी करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येईल.
- चिंतामणी दळवी, उपअभियंता, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
अनेक दिवसांपासून आम्ही या सांडपाण्यातून प्रवास करत आहोत. महापालिकेचा आरोग्य विभाग फक्त दिखाऊ काम करत आहे. आधी खड्डे आणि आता सांडपाण्यातून प्रवास करताना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी.
- विष्णू सरगर, स्थानिक रहिवासी
आकाशनगर परिसरातून येणाऱ्या या सांडपाण्याच्या वाहिनीचा व्यास वाढविण्याची आवश्यकता आहे. वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेच्या नियोजनाचा कोणताही ताळमेळ बसत नसल्याने अशा परिस्थिती उद्भवत आहेत. यावर महापालिका प्रशासनाने त्वरित मार्ग काढणे गरजेचे झाले आहे.
- अनिकेत जावळकर, शिवभक्त प्रतिष्ठान