
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार केला जाणार आहे. या कामासाठी प्रतिकिलोमीटर ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुण्याच्या दक्षिण ते उत्तर या भागाला जोडून वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत, यासाठी हा बोगदा केला जाणार आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मान्यता दिली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून हा बोगदा जाणार आहे. यात दोन्ही बाजूने वाहने ये-जा करणार आहेत. हा बोगदा कुठून सुरू होणार, कुठे बाहेर पडणार, या बोगद्याचे भूमिपूजन कधी होणार? याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘हा बोगदा दक्षिण ते उत्तर या भागाला जोडणारा असेल. ‘पीएमआरएडी’ने बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सुमारे २० किलोमीटर याची लांबी असेल, त्यासाठी प्रतिकिलोमीटर ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. याचा प्रकल्प आराखडा पीएमआरडीए तयार करणार आहे.’’
कात्रज-कोंढवा रस्ता कधी होणार?
कात्रज ते येरवडा असा बोगदा केला जावा, याची फारशी चर्चा पुणे शहरात झालेली नाही. पण आता पीएमआरडीएला हा बोगदा तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सुमारे तीन किलोमीटरच्या कात्रज ते कोंढवा रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करताना महापालिकेच्या नाकीनऊ आली आहेत.
सात वर्षे होऊनही या प्रकल्पाचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाचा तिढा सोडविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने हा प्रकल्प रखडला. पीएमआरडीए शहरात २० किलोमीटरचा बोगदा करणार आहे. पण तोपर्यंत तरी कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.