
पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील (Katraj Kondhva Road) अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधार पडतो. परिणामी, पादचारी व वाहन चालकांना या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी जीव मुठीत धरून जावे लागते.
महापालिकेतर्फे पाच वर्षांपासून कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. भूसंपादनाअभावी केवळ ३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर स्थानिक वाहतुकीसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या भागातून येणाऱ्या अवजड वाहनांची गर्दी असते. गेल्या महिन्यात या रस्त्यावर झालेल्या चार अपघातांत चार जणांचा बळी गेला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती, वाहतूक योजना आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिका आयुक्तांसह इतर अधिकारी, वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून कामाला गती देण्याचा आदेश दिला. तसेच वाहतूक नियोजन करण्यासाठी पुणे महापालिका, वाहतूक पोलिस आणि ‘सीएसआर’मधून १७५ वॉर्डन नियुक्त करण्याचा आदेश दिला होता.
काय आहेत अडचणी?
- कात्रज ते खडी मशिन चौकादरम्यान अनेक ठिकाणी पथदिवेच नाहीत.
- काही ठिकाणी रस्त्याच्या एकाच बाजूला पथदिवे. त्यामुळे प्रकाश व्यवस्था अपुरी.
- अंधारामुळे रस्त्यातील खड्डे, उंचवटे दिसत नाहीत. रस्ता एका पातळीत नसल्याने अपघाताचा धोका.
- अंधारातून चालणाऱ्या पादचाऱ्यांना पाठीमागून येणाऱ्या वाहनांची भीती वाटते.
- खडी मशिन चौक परिसरात सर्वांत जास्त अपघात होत असूनही तेथील पथदिवे बंद. तसेच रस्ताही खराब.
- राजस सोसायटी चौक, माऊलीनगर, शत्रुंजय मंदिर चौक ते कोंढवा स्मशानभूमी परिसरातही पथदिव्यांचा अभाव.
- काही लोकप्रतिनिधींच्या कार्यालय व घराजवळ मात्र मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था.
केवळ २० वॉर्डनची नियुक्ती
कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी महापालिकेकडून १००, वाहतूक पोलिसांकडून ५० आणि ‘सीएसआर’मधून २५ असे १७५ वॉर्डन नियुक्त केले जाणार होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिला होता. एक आठवडा उलटून गेला तरी महापालिकेने फक्त २० वॉर्डनचीच नियुक्ती केली आहे. उर्वरित वॉर्डनची फाइल मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. वाहतूक पोलिसांनी २० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर पथदिव्यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या आहेत. सध्या २० वॉर्डन नियुक्त केले असून, उर्वरित वॉर्डनची फाइल अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविली आहे.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका