
पुणे (Pune) : संपूर्ण शहरात सुमारे नव्वद टक्के खड्डे (Potholes) बुजविण्याचा दावा महापलिका (PMC) प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी, सिंहगड रस्त्यावरील खड्डे (Potholes On Sinhgad Road) अद्यापही बुजविले नसल्याचे चित्र आहे.
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वारंवार मागणी करून देखील पर्यायी रस्ते तसेच सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देण्यात महापालिकेला यश आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, या कामात रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. जे खड्डे बुजविले त्या खड्ड्यांमधील डांबर आत्ताच्या पावसातच निघाले आहेत. सोबतच नव्याने आणखी काही खड्डे निर्माण झाले आहे.
माणिक बाग डीपी रस्ता अर्थात वीर शिवा काशीद चौकात चेंबरचा मोठा खड्डा आहे. डाव्या बाजूला हा खड्डा असून यावर टाकलेल्या चेंबरची झाकणे खचलेली आहेत. शेजारीच हातगाड्या उभ्या असतात तर उजव्या बाजूला उड्डाणपुलाच्या खांबांचे काम सुरू आहे. त्यामुळे जेमतेम एखादी बस आणि एक दुचाकी जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक राहते. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात अशीच परिस्थिती आनंदनगर, माणिक बाग, हिंगणे, विठ्ठलवाडी, राजाराम पूल या सर्व भागात आहे. माणिकबाग, अप्पासाहेब मोरे चौकात देखील हीच परिस्थिती आहे.
सिंहगड रस्ता परिसर भागाची अवस्था अतिशय खराब आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असून रस्त्याच्या खालच्या बाजूस खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच वाहने लावण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. परिणामी उपलब्ध पदपथावर गाड्या लावल्या जातात, तेथेच विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण ही आहे. या सगळ्यातून पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच राहत नाही, अशा स्थितीत चालायचे कसे, हा प्रश्न उपस्थित होतो.
- जयश्री देशपांडे, माणिकबाग