
पुणे (Pune) : ‘आदर्श रस्ते’ योजनेअंतर्गत शहरातील १५ रस्त्यांचे काम महापालिका (PMC) एक ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. सध्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, खड्डे बुजविणे अशी कामे सुरू आहेत.
‘जी-२०’ परिषदेनिमित्त काही रस्त्यांवर रंगरंगोटी, दुरुस्ती, सुशोभीकरण झाले होते. नगर रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यावर भर दिला होता. ‘आदर्श रस्ते’ योजनेत रस्त्यांवर छोट्या स्वरूपात पाणी, सांडपाणी, राडारोडा, कचरा काढणे, रंगरंगोटी, दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावणे, सतत स्वच्छता, देखभाल दुरुस्ती, अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंगवर कारवाई, ओव्हरहेड केबल, अशा कामांवर भर दिला जाणार आहे.
सेवा वाहिन्यांच्या केबलसाठी रस्ते सतत खोदावे लागू नयेत म्हणून प्रमुख रस्त्यांवर पाइप टाकले जातील. पहिल्या टप्प्यात नऊ रस्त्यांची कामे केले जातील. त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. टेंडरला मान्यता देऊन सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे स्वरूप बदलले जाणार आहे.
या रस्त्यांचे बदलणार रूप...
नगर रस्ता, सोलापूर, मगरपट्टा, पाषाण, औंध, बाणेर, संगमवाडी, विमानतळ व्हीआयपी, कर्वे, सातारा, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता), बिबवेवाडी, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता.
पावसामुळे सध्या अतिक्रमणे काढणे, खड्डे बुजविण्यासारखी कामे केली जात आहेत. एक ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका