
पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावर (Ganeshkhind Road) तीन, तर पाषाण (Pashan) रस्त्यावर एक, असे चार समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) उभारण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यापैकी आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) दुहेरी उड्डाण पुलाच्या कामाबरोबरच गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते औंधकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पूल चुकल्याने लॉकडाउनच्या काळात तो पाडण्यात आला. त्यानंतर आता या ठिकाणी मेट्रो आणि वाहने यासाठी दुमजली उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वांत वर मेट्रो मार्ग, त्याखाली वाहनांसाठी उड्डाण पूल बांधला जाईल. त्याखाली ४५ मीटरचा रस्ता असणार आहे. सध्या मेट्रोचे काम सुरू असताना विद्यापीठ चौक परिसरात आणि औंध, बाणेर, पाषाणच्या रस्त्यावर भयंकर वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी एका तासापेक्षा अधिक काळ कोंडीत थांबावे लागत असल्याने या भागातील नागरिक हैराण झाले आहेत.
असे आहे नियोजन...
गणेशोत्सवानंतर ‘पीएमआरडीए’कडून विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचे काम सुरू होईल. हे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. औंध, पाषाण, बाणेरकडे जाण्यासाठी दुहेरी उड्डाण पूल बांधला जाईल. विद्यापीठ चौक, हरेकृष्ण रस्ता, शिमला ऑफिस चौक आणि अभिमान श्री सोसायटी असे चार ग्रेड सेपरेटर केले जाणार आहेत. शिवाजीनगर-औंध रस्त्याच्या ग्रेड सेपरेटरचा डीपीआर ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त होऊन डिसेंबरमध्ये कामाचे आदेश दिले जातील. ‘पीएमआरडीए’चे मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू असताना त्यासोबतच हे काम सुरू असणार आहे. जानेवारी २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा दावा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.
अशी असेल उड्डाण पुलाची रचना
विद्यापीठ चौकात ‘पीएमआरडीए’कडून दुहेरी उड्डाण पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी २७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा उड्डाण पूल ८८१ मीटर लांबीचा आणि ६ पदरी असणार आहे. या पुलावरून शिवाजीनगरकडून जाण्यासाठी २६० मीटरच्या दोन लेन, बाणेर रस्त्याकडे दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन लेन याप्रमाणे १४० मीटर लांबीच्या चार लेन, पाषाण रस्त्याकडे जाण्यासाठी १३५ मीटरच्या दोन लेन असणार आहेत. शिवाजीनगर व सेनापती बापट रस्त्यावरून औंधकडे जाण्यासाठी ग्रेड सेपरेटर असणार आहे, तर बापट रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी विद्यापीठ चौकात येऊन यू-टर्न घेऊन पुढे जावे लागणार आहे. जेथे उड्डाण पूल सुरू होणार आणि संपणार आहे, तेथे दोन्ही बाजूला दोन लेनचे सर्व्हिस रस्ते असणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.
दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक
उड्डाण पूल ‘पीएमआरडीए’ बांधणार, तर ग्रेड सेपरेटर महापालिका बांधणार आहे. त्यामुळे कामाची गती, वाहतूक नियोजन यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. भर पावसाळ्यात गणेशखिंड रस्त्यावर खड्डे पडल्यावर ते बुजवायचे कोणी यावरून दोघांमध्ये एकवाक्यता नव्हती, त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागला. मात्र आता दोन्ही यंत्रणांकडून एकाच रस्त्यावर स्वतंत्रपणे प्रकल्प केले जाणार आहेत. त्यामुळे समन्वय नसल्यास त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आराखडा
विद्यापीठ चौकात प्रत्यक्षात कामाला सुरवात करताना या मार्गावर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या परिसराच्या वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या गणेशखिंड आणि सेनापती बापट रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना बाणेरकडे जाण्यासाठी पाषाण रस्त्याने जावे लगते. अभिमानश्री सोसायटीच्या रस्त्याने पुन्हा बाणेर रस्त्यावर यावे लागते, तर औंधकडे जाणारा रस्ता आतादेखील सुरू आहे. परंतु काम सुरू झाल्यानंतर औंध आणि बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व वाहने पाषाण रस्त्यावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना बाणेर अथवा औंधकडे जाण्यासाठी पाषाण रस्त्याने अभिमान श्री रस्त्याने बाणेर रस्त्यावर यावे लागणार आहे. बाणेरकडे जाणारी वाहने तशीच पुढे जातील, तर औंधकडे जाणारी वाहने बाणेर रस्त्याने खाली येऊन विद्यापीठ चौकातून औंधकडे जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. अभिमानश्री सोसायटी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी आणखी एक पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभिमानश्री सोसायटीच्या अलीकडील बाजूने ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून एक पर्यायी परंतु तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यांचे रुंदीकरणाचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.