
पुणे (Pune) : सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याच्या ठिकाणांवर महापालिकेकडून केली जाणारी कारवाई आता थंडावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. तर ढाबळींवरील कारवाईकडे महापालिकेने अद्यापही लक्ष दिले नसल्याची स्पष्ट झाले आहे.
कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांमध्ये डिसेंबरमध्ये जनजागृती करण्यास एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सुरवात करण्यात आली होती. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न तसेच घाटांवर दशक्रिया विधी कार्यक्रमांमध्येही अडचण येऊ लागल्याने हा उपक्रम हाती घेतला होता.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डिसेंबरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या ठिकाणांवर कारवाई सुरू केली. त्यामध्ये ५२ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ हजार १६० रुपयांचा दंड वसूल केला.
तर पॅनकार्ड क्बल रस्त्यावरील कटके शाळा, कात्रज चौक, कात्रज पेशवे तलाव, वारजे माळवाडी, अप्पर रस्त्यावरील डॉल्फिन चौक व आपटे घाट ही संबंधित कबुतरांना खाद्य टाकण्याची ठिकाणे बंद केल्याचा दावा महापालिकेने केला.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने काही दिवस कारवाईचा फार्स केला, मात्र नव्या वर्षात कबुतरांना खाद्य टाकण्याच्या ठिकाणांवरील कारवाई थंडावली आहे. १ ते ७ जानेवारी या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या केवळ दोघांवर कारवाई करून त्यांच्याकडून दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरूच असल्याचा दावा केला जात आहे.
ढाबळींनाही महापालिकेकडून अभय
बंगले, सोसायट्या, जुने वाडे व वस्त्यांमधील घरांच्या ठिकाणी कबुतर पाळण्याच्या ठिकाणी (ढाबळी) कारवाई करण्याकडे महापालिकेचे अजूनही दुर्लक्षच आहे. सोसायट्यांच्या छतावर ढाबळी थाटल्या असून त्याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर डिसेंबर महिन्यात कारवाई झाली होती. नव्या वर्षातदेखील दंडात्मक कारवाई, नोटीस बजावणे, समज देण्याची कारवाई सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, असे वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका
कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सगळीकडे सुरूच आहेत. महापालिकेचे कर्मचारी तात्पुरती कारवाई करतात. त्यानंतर नेहमीप्रमाणे कारवाईकडे दुर्लक्ष करतात.
- कैलास नांगरे, नागरिक