
पुणे (Pune) : पुणे विमानतळासाठी (Pune Airport) रविवारचा (ता. १३) दिवस ऐतिहासिक ठरला. कारण, पुण्याहून १०५ विमानांचे उड्डाण झाले, तर १०५ विमाने धावपट्टीवर उतरली.
विमानतळाच्या इतिहासात २१० विमानांची वाहतूक पहिल्यांदाच झाली असून, त्यातून ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यापूर्वी एका दिवसात २०८ विमानांचा विक्रम झाला होता. आता नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात हवाईदलाने विमानतळ प्रशासनाला २१८ स्लॉट (विमान उतरण्याची व उड्डाणाची निर्धारित वेळ) उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी २१० स्लॉट विमान कंपन्यांनी आरक्षित केले आहेत. उर्वरित आठ स्लॉट रिकामे आहेत.
दरम्यान, पुणे विमानतळावर रविवारी अतिशय व्यग्रता होती. असे असले तरीही ‘पार्किंग बे’ची समस्या निर्माण झाली नाही. परिणामी एकाही विमानाला गो अराउंड द्यावा लागला नाही, अन्यथा विमानांची संख्या वाढल्यावर ‘पार्किंग बे’ची समस्या जाणवते. परिणामी विमानाला गो अराऊंड द्यावा लागतो. त्याचा फटका प्रवाशांना बसतो.
पुणे विमानतळाच्या इतिहासात रविवारी सर्वाधिक विमानांची वाहतूक झाली. पुण्याहून वेगवेगळ्या शहरांसाठी सेवा सुरू झाली आहे, तसेच ज्या भागामध्ये प्रवाशांना चांगला प्रतिसाद लाभत आहे, तिथेही विमानांची संख्या वाढली आहे. परिणामी विमानांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे