
पुणे (Pune) : विद्यापीठातील खरेदी आणि विक्रीचे व्यवहार, टेंडर (Tender) प्रक्रियेसाठी केंद्रीय व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.
विद्यापीठात प्रत्येकी एक हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्रपणे वसतीगृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. येत्या दीड वर्षात हे वसतीगृह उपलब्ध होईल. याशिवाय विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या खानावळीच्या (मेस) प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकाचवेळी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे जेवण तयार होईल, असे ‘स्टीम बेस सेंट्रल किचन’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,’’ असे कुलगुरू म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात डॉ. गोसावी बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. विद्यापीठ लवकरच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. यानिमित्ताने विद्यापीठातर्फे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.
डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘जगभरातील नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार पोस्ट डॉक्टरल फेलोशिप देण्यात येणार आहे. केंद्रीय वन मंत्रालयासमवेत केलेल्या करारानुसार देशभरातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर येथील उपकेंद्रात स्कूल ऑफ मल्टीडिसीप्लिनरी उभारण्यात येईल. याद्वारे स्थानिक गरजा लक्षात घेऊन उपक्रम राबविले जातील.’’
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यादृष्टीने विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची निर्मिती ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल. विद्यापीठाला ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनंस’ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असेही डॉ. गोसावी यांनी सांगितले.