
पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) इतिहासात पहिल्यांदाच विमानांसाठी २३५ स्लॉट (विमान उड्डाण व उतरण्याची ठरलेली वेळ) उपलब्ध झाले आहेत. उन्हाळी हंगामात प्रशासनाने २२० स्लॉट उपलब्ध केले होते. त्यात आता १५ स्लॉटची भर पडली आहे.
पुणे विमानतळ हवाई दलाचे तळ (बेस) असल्याने येथे नागरी विमानांसाठी स्लॉट वाढविणे हे खूप आव्हानात्मक होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे स्लॉट वाढविण्यासाठी प्रयत्नशील होते, त्याला अखेर यश आले. स्लॉट वाढल्याने पुणे विमानतळाहून गंतव्य (डेस्टिनेशन) व विमानांची वाहतूक वाढणार आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी पुण्याहून सुमारे एक कोटी पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला. नवीन टर्मिनलमुळे पुढील वर्षात प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार, हे निश्चित आहे.
वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विमानांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. मात्र स्लॉटच्या वाढीसाठी मर्यादा होत्या. मात्र मंत्री मोहोळ यांच्या प्रयत्नांनंतर आता हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी स्लॉट वाढविण्यास मंजुरी दिल्याचे पत्र विमानतळ प्रशासनाला पाठविले आहे.
विमान सेवेचा विस्तार शक्य
पुण्याहून सध्या ३४ शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यात वाराणसी, चेन्नई, बंगळूर, दिल्ली, लखनौ, नागपूर, हैदराबाद आदी प्रमुख शहरांसाठी सेवा आहे. पुण्याहून सर्वात जास्त विमाने दिल्लीसाठी उडतात. स्लॉटची संख्या वाढल्याने विमान कंपन्यांना आपल्या विमान सेवेचा विस्तार करणे सहज शक्य आहे.
अतिरिक्त स्लॉट हा सकाळी सहा ते रात्री १० वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणजेच या वेळेत विमानांची वाहतूक वाढू शकते. मात्र यासाठी विमान कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विविध पातळीवर सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून विमानांची संख्या वाढविण्यासाठी स्लॉटची संख्या वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी प्रयत्न केले, आता त्याला यश प्राप्त झाले आहे. स्लॉट वाढल्याने विमानांची संख्या व प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री