
पुणे (Pune) : पुणे शहराचा पुढील १०० वर्षांचा विचार करून पुणे विमानतळ (Pune Airport) २०० एकर जागेत विस्तारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई दलाची (Indian Airforce) २५ व खासगी ६५ एकरसह अन्य ठिकाणची जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये सामान्य प्रवाशांसाठीच्या ‘उडान यात्रा कॅफे’चे उद्घाटन सोमवारी (ता. २८) मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे विमानतळाच्या सल्लागार समितीच्या सदस्यांसह विमानतळ संचालक संतोष ढोके उपस्थित होते. कॅफेच्या उद्घाटनानंतर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोहोळ म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत विमानतळ ४४ एकर जागेत आहे. येत्या काळात त्याचा विस्तार आणि विकास केला जाणार आहे. हवाई दलाच्या २५ एकर जागेत रडार आहे, ते दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने हवाई दलाला दुप्पट जागा देण्याचे ठरविले आहे. शिवाय हवाई दल जागा देण्यास सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.’’
या पत्रकार परिषदेस आमदार बापू पठारे, विमानतळ संचालक ढोके आदी उपस्थित होते.
धावपट्टी वाढणार
पुणे विमानतळावरील धावपट्टी एक किलोमीटरने वाढणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होईल. धावपट्टी दोन्ही दिशेला वाढवली जाणार आहे. पूर्वेला ६५०, तर पश्चिमेला ३५० मीटर, असे मिळून एक हजार मीटरने धावपट्टी वाढणार आहे. या कामासाठी सुमारे दोन वर्षे लागणार आहेत.
सद्यःस्थितीत धावपट्टीची लांबी दोन हजार ५३५ मीटर (आठ हजार ३१६ फूट); तर रुंदी ४५ मीटर आहे. धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक असून, रुंदी वाढविण्याची गरज नसल्याचे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
खराडी-विमानतळ मेट्रोने जोडणार
खडकवासला ते खराडी या प्रस्तावित मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी खराडी ते पुणे विमानतळ मार्गिकेसाठी ‘डीपीआर’ तयार करण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे मेट्रो प्रशासनाचे म्हणणे आहे. खराडी ते पुणे विमानतळ मेट्रोने जोडल्याने प्रवाशांची मोठी सोय होईल, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.