
पुणे (Pune): पानशेत आणि खडकवासला धरणग्रस्तांचे दौंड तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आलेल्या वसाहतीतील रहिवाशांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच, त्यांच्या गावठाणाचा समावेश ग्रामपंचायतींच्या हद्दीत करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेले त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील ही दोन धरणे आहेत. या धरणासाठी ज्यांच्या जागा घेण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांचे दौंड तालुक्यातील ४२ गावांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु, ले आउट मंजूर असूनदेखील तेथील नागरिकांना कायदेशीर मालकी हक्क असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले नाही.
स्वामित्व योजनेतंर्गत त्यांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकाराचा प्रयोग राबविला जाणार आहे.
जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये या पुनर्वसन वसाहतींतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या पुनर्वसन वसाहतीचे नुकतेच ड्रोन सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. तसेच या वसाहतींचा ग्राम पंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.
सुमारे पाच हजार धरणग्रस्त कुटुंबे आहेत. त्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच, या मोहिमेतून तेथे किती जागा शिल्लक आहे, हे देखील समोर येणार आहे. त्यांनतर ज्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही, त्यांना देणे शक्य होणार आहे. या धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी काही प्रश्न या मोहिमेमुळे सुटण्यास मदत होणार आहे.
- सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी