
पुणे (Pune) : पहाटे चार वाजता पुणे विमानतळावर (Pune Airport) दाखल झालेले प्रवासी दुपारी साडेतीनवाजेपर्यंत विमानतळावर विमानाची वाट पाहत बसून होते. यामुळे १८० प्रवाशांना तब्बल १२ तास विमानाची वाट पाहत थांबावे लागले.
कोणाला दिल्लीला जायचे होते तर कोणाला कनेक्टिंग फ्लाइट पडकडायची होती. कुणी माझ्या कंपनीचे महत्त्वाच्या बैठका असल्याचे सांगत होता. कुणी वैद्यकीय उपचारासाठी, तर कुणी अन्य काही कारणासाठी पुणे विमानतळावरून एअर एशियाच्या विमानाने दिल्ली गाठणार होते. मात्र, विमानाचे टायर फुटल्याचे सांगून विमान कंपनीने प्रवाशांना दुपारी साडेतीनपर्यंत थांबून ठेवले.
सध्या सुटीचा हंगाम असल्याने विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी एअर एशियाचे विमान झेपावणार होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्या विमानाचे उड्डाण झाले नाही. सकाळी १० वाजेपर्यंत प्रवाशांना कोणतीच माहिती दिली गेली नाही.
केवळ तांत्रिक कारणास्तव विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले. काही प्रवाशांनी गोंधळ केल्यावर संबंधित विमान कंपनीने विमानाचे टायर फुटल्याचे कारण सांगितले. काही वेळानंतर त्यांना नाश्ता देण्यात आला. दुसरीकडे प्रवासी प्रचंड संतापलेले होते. मात्र, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण, सध्या पुणे-दिल्ली विमानाचे तिकीट दर हे प्रति प्रवासी २५ हजार रुपये इतके आहेत.
त्यामुळे १८० प्रवासी दुसऱ्या विमानांची वाट पाहत तसेच थांबून राहिले. यादरम्यान अनेकांच्या पुढच्या कनेक्टिंग फ्लाइट रद्द झाल्या. काहींनी दिल्लीला जाणे रद्द करून आपले घर गाठले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फ्लाइटची घोषणा झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.