
पिंपरी (Pimpri) : महापालिकेकडे नोंदणी न झालेल्या शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात आढळलेल्या व नव्याने कर आकारणी झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील मालमत्ताधारकांकडील थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे, अशा थकबाकीदारांची यादी थकबाकी रकमेसह सोसायट्यांच्या अध्यक्षांना पाठविली जात आहे. ही यादी सोसायटीत ठळक जागी सूचना फलकावर लावून सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवावी आणि थकबाकीदार सभासदांना थकबाकी भरण्यासाठी सांगावे, यासह थकबाकीदारांनीही थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने केले आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट या खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये ६४ हजार २६० मालमत्ता आढळल्या असून त्यांची नव्याने आकारणी करण्यात आली आहे. या मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची देयकेही दिली आहेत. तसेच त्यांना एसएमएस, टेलिकॉलिंग माध्यमातून करभरणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाने वारंवार केले जात आहे. तरीही थकबाकी न भरल्याने मालमत्ताधारक राहात असलेल्या ६५१ सोसायट्यांचे अध्यक्ष तथा चेअरमन यांना माहिती पाठवली आहे. त्यामध्ये सोसायटीतील थकबाकीदार मालमत्ताधारकांची संपूर्ण माहिती (उदा. थकबाकीदार मालमत्ताधारकाचे नाव, थकीत रक्कम) पाठविण्यात येणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांची यादी सोसायटीचे नोटीस फलक, सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाठवून थकबाकीदार सदस्यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आवाहन करावे, असे कळविण्यात आले आहे.
सोसायटी अध्यक्षांना आवाहन...
आकारणी न झालेल्या मालमत्तांची नोंदणी व कर आकारणी कार्यवाही करण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट कंपनीकडून मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. नव्याने आकारणी झालेल्या सोसायट्यांमधील मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी वारंवार विविध माध्यमांतून आवाहन केले जात आहे. परंतु, अद्यापही कराचा भरणा न केलेल्या सोसायट्यांमधील मालमत्तांची यादी संबंधित सोसायटी अध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे. सोसायटी अध्यक्षांनी सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना तात्काळ कराचा भरणा करण्याचे आवाहन करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
सर्वेक्षणातील वास्तव...
नोंदणी नसलेल्या सोसायट्या : ६९०
मालमत्ताकराचे देयक दिलेल्या सोसायट्या : ६५१
सोसायट्यांतील सदनिकांसह नोंदणी नसलेल्या एकूण मालमत्ता : ६४,२६०
सोसायट्यांमधील मालमत्ता : ५६,२३२
देयक दिलेल्या सोसायट्यांमधील सदनिकाधारक : ३६,९८०
देयक दिलेल्या सोसायट्यांतील सदनिकाधारकांकडे थकबाकी : ६९.५६ कोटी
मालमत्ता सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या व नव्याने कर आकारणी झालेल्या सोसायट्यांमधील मालमत्तांधारकांकडे ६९ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. अशा सोसायट्यांच्या अध्यक्षांना करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांची यादी थकबाकीच्या रकमेसह पाठविण्यात येणार आहे. सोसायटी अध्यक्षांनी संबंधित यादी सोसायटीत ठळक जागी सूचना फलक व सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवावी. थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम तात्काळ ऑनलाइन प्रणालीद्वारे भरणा करण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, महापालिका