पिंपरी (Pimpri) : विविध वाहिन्या टाकण्यासाठी शहरातील काही रस्त्यांवर खोदाई केली आहे. काही रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे होत असली तरी, ती वेळेत पूर्ण न झाल्याने आणि गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे कामांच्या ठिकाणी रस्त्यांवर चिखल होऊन, यंत्रणाच खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. महापालिका प्रशासन अशा कामांबाबत ‘नापास’ झाल्याचे चित्र शहरात आहे.
मुंबई-बंगळूर, मुंबई-पुणे व पुणे-नाशिक महामार्गासह शहरात भोसरी-निगडी टेल्को रस्ता, स्पाइ रस्ता, आळंदी-देहू रस्ता, काळेवाडी फाटा -चिखली रस्ता, औंध-रावेत बीआरटी रोडी, चिखली- केएसबी चौक- चिंचवड स्टेशन- डांगे चौक- भूमकर चौक- हिंजवडी, निगडी ते रावेत बीआरटी मार्ग असे मोठे रस्ते आहेत. यातील काही रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, पदपथांची कामे, पेव्हिंग ब्लॉक, जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला होता. मात्र, बहुतांश रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. पावसामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
प्रत्येक प्रभागात ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भोसरीतील शांतीनगर, आदिनाथनगर भागात पाणी साचले जाते. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या वाहिन्या अनेक ठिकाणी ‘ड्रेनेजलाईन’ला जोडल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ‘ड्रेनेज चोकअप’ होत असल्यामुळे ‘ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल’ची संख्या वाढवावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यावर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये ‘ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल’ आहेत. आपत्तीकाळात खबरदारी म्हणून महापालिका मुख्यालयात आणखी एक ड्रेनेज क्लिनिंग व्हेईकल तैनात करण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना केली आहे.
खोदलेले रस्ते
- भोसरी-निगडी टेल्को रस्ता दोन्ही बाजूस खोदकाम
- भोसरी लांडेवाडी ते फिलिप्स चौक एमआयडीसी रस्ता
- स्पाइन रस्ता सेवा रस्त्यावर विविध ठिकाणी काम सुरू
- मोशी उपबाजार ते जाधववाडी रस्त्यावर सांडपाणी वाहिन्या टाकून पदपथ निर्मितीचे काम
- निगडी टिळक चौक ते दुर्गा चौक यमुनानगरमधील रस्ता
- वाल्हेकरवाडी गुरुद्वारासमोर लोहमार्गाखालील भुयारी मार्गालगत
- वाकडमधील दत्तमंदिर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, ठिकठिकाणी खोदकाम
- वाकडमधील लक्ष्मीनगर विनोदे चौक परिसरातील रस्ता
- देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत खड्ड्यांमुळे चिखल
रस्ते खोदाई केल्यास फौजदारी
वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यात महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिःसारण, विद्युत, पर्यावरण आदींसह खासगी सेवा कंपन्यांचाही समावेश असतो. त्यामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था होते. खोदलेले रस्ते दुरुस्तीसाठी विलंब होत असतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. विना परवानगी रस्ते खोदाई करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने फौजदारी कारवाई सुरू केली आहे. तसेच, कामांना विलंब करणाऱ्यांना ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्याच आठवड्यात देविका इलेक्ट्रिक कंपनीतर्फे काम करणाऱ्याविरुद्ध सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.