पिंपरी (Pimpri) : खडकी बाजार आणि पिंपरी-चिंचवडमधील बोपखेलला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम ९८ टक्के झाले आहे. उर्वरित किरकोळ स्वरूपाची कामे राहिली असून ऑगस्ट महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
बोपखेल गावासाठी दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) हद्दीतून रस्ता होता. दोन्ही गावांतील अंतर अवघे दोन किलोमीटर होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ पासून हा रस्ता रहदारीस बंद झाला. परिणामी, बोपखेलच्या रहिवाशांना दापोडीकडे जाण्यासाठी सुमारे १६ किलोमीटरचा वळसा घालून दिघी, भोसरी, कासारवाडी मार्गे किंवा कळस, विश्रांतवाडी, खडकी, बोपोडी मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे, नागरिकांसह विद्यार्थी व कामगारांची गैरसोय होत आहे. दरम्यान, २० जुलै २०१९ रोजी बोपखेल व खडकी यांना जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला. पुलासाठी ५३ कोटी ५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी होता. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे काम लांबले. ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यापूर्वीच काम पूर्ण होऊन पूल रहदारीस खुला करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
दृष्टिक्षेपात बोपखेल पूल
लांबी : १८५६ मीटर
रुंदी : ८.४० मीटर
पोहोच रस्त्यांची लांबी
बोपखेल बाजू : ५८ मीटर
खडकी बाजू : २६२ मीटर
बोपखेल व खडकी जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम ९८ टक्के झाले आहे. संरक्षण खाते व वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ऑगस्ट २०२४ अखेरीस पूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे. बोपखेल येथील नागरिक व कामगार यांची सोय होऊन प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे.
- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, प्रकल्प विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका