पिंपरी (Pimpri) : औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख येथील लष्करी हद्दीत भुयारी मार्गाचे काम करण्यात येणार आहे. या कामास अडथळा ठरणारी ४० झाडे हटविण्यात येणार आहेत. त्यापैकी १३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
पिंपळे निलखमधून बाणेर, बालेवाडी भागात जाण्यासाठी सोयीचे ठरते त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. हिंजवडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. वाहनांच्या संख्येत वाढ होऊन रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.
रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी तेथे भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या १८ मीटर रस्त्यास भुयारी मार्ग उभारण्यासाठी ७ कोटी ६२ लाख ८ हजार २१३ रुपये दराचे टेंडरप्रक्रिया राबवली होती. सर्वांत कमी दराची पाच कोटी ७३ लाख १० हजार ८०६ रुपये दराचे टेंडर महापालिकेने स्वीकारले आहे.
सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना
भुयारी मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे काढण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार, नऊ रेनट्री, काटेरी बाभूळ, सहा बोर, आठ शिसू, एक सुबाभूळ, तीन ग्लिरिसिडीया, एक शिरस तीन इतर अशी एकूण ४० झाडे तोडण्यात आली आहेत; तर पाच पिंपळ, एक कॅशिया, दोन भेंडी, कडुनिंब, एक कांचन, दोन तपशी अशा १३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पुनर्रोपण केल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल उद्यान विभागाला सादर करावा लागणार आहे.
भुयारी मार्गासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. मात्र, कोणतीही विकासकामे करताना वृक्षतोड न करता त्या वृक्षांचे स्थलांतर केले पाहिजे. तशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धती देखील उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून झाडांचे इतर ठिकाणी वृक्षारोपण करावे.
- तनय पटेकर, पर्यावरण प्रेमी