
पिंपरी (Pimpri) : संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी सोहळ्यांच्या (Palkhi Procession) पार्श्वभूमीवर महापालिकेने (PCMC) पालखी मार्गांलगतच्या एक हजार ४९४ अधिकृत जाहिरात फलकधारकांना (Hoardings) सुरक्षेसंदर्भात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
निगडी ते दापोडी, देहू ते आळंदी आणि दिघी ते बोपखेल या पालखी मार्गांवरील फलकांबाबत महापालिकेने जाहिरातदारांना सूचित केले आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता या फलकांची तातडीने तपासणी करून आवश्यक बळकटीकरण करण्याची सूचना केली आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपआयुक्त राजेश आगळे म्हणाले, ‘‘पालखी मार्गावरील सर्व फलकांना वैध परवाने व अद्ययावत संरचनात्मक स्थिरता (स्ट्रक्चरल ऑडिट) प्रमाणपत्रे दिली होती. तरीही खबरदारीच्यादृष्टीने प्रत्येक जाहिरात एजन्सीला त्यांच्या फलकांची स्थिती पुन्हा तपासण्याच्या व आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित एजन्सी जबाबदार असणार आहे.’’
सुरक्षा तपासणी अहवालानुसार...
- भक्ती शक्ती चौक ते दापोडी दरम्यानच्या ११ किलोमीटर अंतरातील ७१ फलकांची तपासणी केली
- चऱ्होली फाटा ते बोपखेल कॉर्नर या १२ किलोमीटर अंतरातील ६४ फलकांची तपासणी
- देहू ते आळंदी या १५ किलोमीटर अंतरातील ८० फलक महापालिका हद्दीत आढळले
- सर्व अधिकृत फलक तपासले असून त्यांचा आकार ४० बाय २० फुटांपेक्षा अधिक नाही
- तपासणीदरम्यान कोणताही अनधिकृत फलक आढळलेला नाही
- कोणत्याही फलकाच्या सुरक्षेसंदर्भात धोका निर्माण झाल्यास महापालिका तत्काळ कारवाई करणार
- पालखी सोहळा सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक व स्वच्छता विभाग सज्ज
शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेत भर घालणारा आषाढी वारी पालखी सोहळा आहे. त्याच्या स्वागतादरम्यान लाखो भाविकांच्या सुरक्षेची आपली सामूहिक जबाबदारी आहे. तरी खबरदारी म्हणून सर्व जाहिरात फलकधारकांनी नियमांचे पालन करून पालखी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका