
पुणे (Pune) : पुण्यात थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल २१० उद्याने पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) साकारलेली आहेत. पण, आता त्यांची देखभाल-दुरुस्ती करताना महापालिकेच्या नाकी नऊ येत आहे. निधीची कमतरता आहेच, पण जागोजागी पडलेला कचरा, अस्वच्छ स्वच्छतागृहे, तुटलेली कचराकुंडी अशा अनेक समस्यांमध्ये उद्याने सापडली आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी १५ कोटींची टेंडर प्रशासनाने काढली आहेत. पण, आता तरी उद्याने सुंदर दिसणार का, असा प्रश्न या उपस्थित होत आहे.
सारसबाग, पु. ल. देशपांडे उद्यान, संभाजी उद्यान यासह अनेक नावाजलेली उद्याने शहरात आहेत. मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, खेळण्यासाठी म्हणून उद्याने उभारली जात आहेत. ज्या ठिकाणी उद्यानांसाठी जागा नाही, तेथे नाला गार्डन अशा संकल्पना पुढे आल्या. त्यातून पुण्यातील उद्यानांची संख्या २१० पर्यंत गेलेली आहे.
एक उद्यानाच्या निर्मितीसाठी चार ते पाच कोटींचा खर्च केला जातो. मात्र, देखभाल-दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. उद्यानातील माळी, स्वच्छतागृह व इतर स्थापत्य विषयक कामांचा समावेश असतो. त्यासाठी प्रत्येक कामासाठी प्रत्येक परिमंडळाकडून प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे पाच परिमंडळांमध्ये स्वतंत्र टेंडर काढली जातात. त्यामुळे २१० उद्यानांसाठी माळीकामासाठी ५ कोटी, विद्युतसाठी ५ कोटी आणि स्थापत्य विषयक कामासाठी ५ कोटी, असे एकूण १५ कोटींचा निधी उपलब्ध होतो.
दरवर्षी हा निधी खर्च केला जातो, पण उद्यानांची स्थिती मात्र सुधारलेली नाही. अनेक उद्यानात अस्वच्छता आहे, बाकडे, कचराकुंडी, स्वच्छतागृहातील कमोड तुटलेली आहेत, पाणी, विद्युत व्यवस्था नाही, सीसीटीव्ही बंद आहेत, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी तक्रार केली, तर निधी उपलब्ध नाही असे सांगून समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे उद्यानांमधील समस्या ‘जैसे थे’च आहेत.
उद्याने वाढली; पण निधी कमीच
शहरातील उद्यानांची संख्या वाढत जात आहे, त्या तुलनेत देखभाल-दुरुस्तीचा खर्च व तरतूद वाढलेली नाही. उपलब्ध तरतुदींमधून सर्व उद्यानांची देखभाल करणे शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकांची मागणी असूनही सर्व ठिकाणची कामे होत नसल्याने तक्रार करण्यात येत आहे.
पुणे शहरातील २१० उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी परिमंडळ स्तरावरून टेंडर काढले आहेत. यामध्ये विद्युत स्थापत्य विषयक आणि माळी कामासंदर्भात प्रत्येकी पाच कोटींची तरतूद उपलब्ध आहे. उद्यानातील खराब झालेल्या वस्तू, साहित्य व सुविधांसाठी हा निधी वर्षभर वापरला जाणार आहे.
- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग
वडगाव येथे कॅनॉलच्या बाजूने उद्यान विकसित केले, पण त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. उद्यानात कचरा पडला आहे, गवत वाढले आहे. याकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे.
- बापू आखाडे, नागरिक