.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : स्वारगेट-कात्रज मार्गावर मेट्रोच्या तीन स्थानकांऐवजी पाच स्थानके करण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याची सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी मेट्रो प्रशासनाला केली आहे.
मिसाळ यांनी सोमवारी मेट्रो कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या मार्गावर बालाजीनगर, सहकारनगर-बिबवेवाडी या स्थानकांचा समावेश करावा, असे त्यांनी म्हटले आहे. स्वारगेट मेट्रो स्थानकापासून कात्रज पर्यंतच्या साडेपाच किलोमीटर अंतरावरील मार्केटयार्ड, पद्मावती व कात्रज या तीन मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या भूमिगत मेट्रो मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून अल्पावधीतच काम सुरू होणार आहे. मिसाळ म्हणाल्या, ‘‘राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रान्स्पोर्ट मॅपिंग’चा विषय हाती घेतला आहे. मेट्रो, बस, रेल्वे, रिक्षा आदी पर्याय कुठे उपलब्ध आहेत याची एकत्रित माहिती प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत विविध यंत्रणांशी समन्वय साधून आम्ही एकत्रित नकाशा तयार करीत आहोत.’’ या वेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
या मार्गांचा केंद्राकडून लवकरच निर्णय
- वनाज ते चांदणी चौक
- रामवाडी ते वाघोली
- खडकवासला ते खराडी
माणिकबाग- वारजे- एसएनडीटी
दोन एसटी स्थानकांबाबतही सूचना जोडणार
स्वारगेट मेट्रो स्थानकापाशी ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ तयार करण्यात येत आहे. ते स्वारगेट एसटी स्थानकासही जोडण्यात यावे असा प्रस्ताव पुणे मेट्रोने एसटी महामंडळाला द्यावा. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल. याशिवाय शिवाजीनगर मेट्रो स्थानकही शिवाजीनगर एसटी स्थानकाला कसे जोडता येईल याचा आराखडा तयार करावा अशा सूचना मिसाळ यांनी मेट्रो प्रशासनाला केल्या.