
पुणे (Pune) : स्वारगेट बस स्थानकात बहुविध स्थानक (मल्टी मॉडेल हब) बनविण्याचा पुन्हा एकदा विचार मांडण्यात आला आहे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी बैठक घेऊन याविषयी माहिती घेत मेट्रोला सुधारित आराखडा सादर करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी देखील स्वारगेट स्थानकात मबहुविध स्थानकाचा प्रस्ताव होता. मात्र त्याबाबत काहीच घडले नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बस स्थानकाची सुमारे १३ एकर जागा आहे. या ठिकाणी बस स्थानक, आगार, अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. हे सर्व पाडून त्या जागेवर आधुनिक बस स्थानक बांधणे तसेच पार्किंग, व्यावसायिक कार्यालय, मॉल, प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बहुविध स्थानक बांधण्याचा विचार आहे. मिसाळ यांनी यासंदर्भात मुंबईत परिवहन विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच पूर्वी मेट्रो प्रशासन एसटीच्या जागेत बहुविध स्थानकासाठी इच्छुक असल्याने आता देखील मेट्रो प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत आराखडा तयार करण्याचा आदेश मिसाळ यांनी दिला आहे.
या विषयांवर चर्चा
- राज्यातील सर्व बसस्थानकांवर महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी
- एसटी महामंडळ तोट्यात आहे, ते नफ्यात येण्यासाठी महामंडळाने आराखडा तयार करावा
- स्क्रॅपिंग धोरणानुसार जुन्या बस भंगारात काढणे
- सुरक्षित प्रवासासाठी चालकांची मद्य प्राशनासंदर्भात तपासणी करावी
- रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे
प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर बहुविध स्थानक तयार करण्याचा विचार आहे. याबाबत आराखडा सादर करण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत.
- माधुरी मिसाळ, परिवहन राज्यमंत्री