पिंपरी (Pimpri) : गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली. मात्र, गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील शिधाविना कोरडी साजरी झाली. आता आचारसंहितेमुळे ‘आनंदाचा शिधा’ रास्त धान्य दुकानात पोचलाच नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे, गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या शिध्याचा ‘आनंद’च हिरावला गेला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयांत गरिबांना ‘आनंदाचा शिधा’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर, येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्डधारकांना प्रती कार्ड एक साडी आणि दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते. काहींनी साडी, पिशव्या देणे सुरू केले होते; तर काहींच्या रास्त धान्य दुकानांवर साड्या, पिशव्या येणे बाकी होते. मात्र, गोंधळ उडाला आणि दिवाळी शिध्याविनाच झाली. त्यापाठोपाठ गुढी पाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील तशीच गेली. गरजू नागरिक रास्त धान्य दुकानात चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत. परंतु, आचारसंहितेमुळे शिधा पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. शिधाची सामग्री अद्याप पोचलेली नाही. आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रास्त धान्य दुकानांतून देणे बंद करण्यात आले आहे. तसे आदेशच शासनाने काढले आहे. शहरासाठी १ लाख १६ कार्ड धारकांना दर महिन्याला आनंदाचा शिधा मिळत होता. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, हरभरा डाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत होता.
योजना आणि त्यांचे लाभार्थी...
- शहरातील अंत्योदय व प्राधान्यक्रम योजना
- दोन लाख शिधापत्रिकाधारक लाभार्थी
- १ लाख १६ हजार जणांना मिळणार शिध्याचा संच.
- अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल
- शासकीय गोदामात रवा, साखर, गोडेतेल नाही
आकडे बोलतात
मंडलनिहाय - लाभार्थी व संच (किट) संख्या
चिंचवड - ४० हजार १९२
पिंपरी - ३५ हजार ७१२
भोसरी - ४० हजार १०५
‘‘लोकसभा निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता आहे. त्यामुळे वाटप करण्यास अडचणी आहेत. लवकरच आनंदाचा शिध्याचे वाटप करण्यात येईल.’’
- गजानन देशमुख, अन्नपुरवठा अधिकारी