
पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वंडर सिटी ते राजस सोसायटी दरम्यानच्या जागा भूसंपादन करण्यासाठी जागा मालकांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी नऊ कोटी ५७ लाख एक हजार २१० रुपयांच्या निधीला स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम २०१७ पासून सुरु झाले आहे. पण महापालिकेला भूसंपादन करता न आल्याने हा प्रकल्प रखडला आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी जागा मालकांशी संवाद साधण्यात आलेल्या अपयशामुळे हा प्रकल्प लांबला आणि त्याच्या भूसंपादनाचा खर्चही वाढली आहे. पूर्वी भूसंपादनासाठी ७५० कोटी रुपये लागणार होते, आता एकूण खर्च ११०० कोटींच्या घरात गेला आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम करण्यासाठी ८८३ कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार आहेत. राज्य सरकारने भूसंपादनासाठी १३९.८३ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. महापालिकेने यासाठी आणखी ४२५ कोटी रुपये शासनाकडे मागितले आहेत.
अशी होणार प्रक्रिया...
१) कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय. त्यानुसार ५० मिटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
२) सात जागा मालकांकडून २७०५ चौरस मिटर जागा ताब्यात घेण्यासाठी मूल्यांकन
३) मूल्यांकन शुल्कावरील ७ टक्के शुल्क, एकूण मूल्यांकनावर येणारी सरळकृती मुद्रांक शुल्क ७ टक्के, नोंदणी शुल्क, मोजणी रक्कम आणि एक टक्का टीडीएस कपात करून उर्वरित रक्कम जागा मालकास देणार
४) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ९ कोटी ५७ लाख १ हजार २१० रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला मान्य