
पुणे (Katraj Chowk Traffic Jam): कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने खासगी मालकीची जागा ताब्यात घेतली. त्यानंतर १५ दिवसांत रस्ता खुला केला जाईल, असा दावा केला होता, पण चार ते पाच महिने उलटूनही येथील रस्ता खुला झालेला नाही. शिवाय वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने रात्री उशिरापर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेने खासगी जागा मालकाला तब्बल २१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये देऊन कात्रज चौकातील भूखंड ताब्यात घेतला आहे. ही जागा मिळताच त्या ठिकाणी पथ विभागाने त्वरित रस्ता करण्याचे काम सुरू केले. या ठिकाणावरून अवघ्या १५ दिवसांत वाहतूक सुरू होईल. त्यामुळे या चौकातील कोंडी कमी होईल, असा दावा केला होता.
या भूखंडावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला आहे; पण कात्रज चौकातून कोंढव्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी अद्यापही खुला केलेला नाही. महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने या चौकात वाहतूक कोंडी कायम आहे.
कात्रज चौकात रविवारी (ता. १३) रात्री नऊ ते १२ वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रात्री नऊनंतर पोलिस निघून गेल्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक ठप्प झाली. पादचाऱ्यांना चालण्यासाठी ही रस्ता मिळत नव्हता. चौकातील वाहतूक कोंडीची तक्रार गेल्यानंतर पुन्हा वाहतूक पोलिस या चौकात आले. त्यांना वाहतूक सुरळीत करण्यास रात्रीचे बारा वाजले.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. चौकातील रस्ताही खराब झाला असल्याने वाहतूक मंदावत आहे. रस्ता दुरुस्त करण्याकडे उड्डाणपुलाच्या ठेकेदाराकडून व महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.