पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhwa Road) काम महापालिका प्रशासनाकडून (PMC) सुरू आहे. एक महिन्यात दीड किलोमीटर सेवा रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सेवा रस्त्याने वाहतूक वळवून शत्रुंजय चौकातील उड्डाणपुलाच्या मुख्य कामाला सुरूवात होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. जमिनींचा ताबा मिळण्यासाठी महापालिकेला अजूनही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. जागा मालकांना रोख रक्कम दिल्यानंतर जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
शत्रुंजय चौक ते टिळेकरनगर, टिळेकरनगर ते भैरोबानाला येथील सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. भैरोबानाला ते खडीमशिन चौक या टप्प्यावरील सेवा रस्त्याचे काम सुरू आहे, हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शत्रुंजय चौक ते खडीमशिन चौक हा दीड किलोमीटरचा सेवा रस्ता पूर्ण होऊन त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकणार आहे.
शत्रुंजय चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आगामी एका महिन्यात उड्डाणपुलाच्या मुख्य कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झालेल्या सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात येईल. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे शत्रुंजय चौक ते खडीमशिन चौकापर्यंतच्या दीड किलोमीटरच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण होईल. त्यावरून वाहतूक वळविल्यानंतर उड्डाणपुलाच्या मुख्य कामाला सुरवात होईल.
- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथ विभाग, महापालिका