
पुणे (Pune) : पुण्यातील वाहनचालकांना आता वाहनपरवाना चाचणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेत जावे लागणार नाही. कारण हडपसर व आळंदी रस्ता येथील ‘आरटीओ’च्या (RTO) जागेत आधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग सेंटर (स्वयंचलित वाहनचालक चाचणी केंद्र) सुरू करण्यास परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात सोमवारी कामाचा आदेशही निघाला. यामुळे वाहनधारकांच्या वेळेत बचत होणार आहे.
पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरातच टेस्ट सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. त्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांना प्रस्ताव पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून कामाचा आदेशही निघाला आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल.
...असा असेल ट्रॅक
१. आठ (8) आकाराच्या ट्रॅकवर वाहन चालविणे, वाहन ट्रॅकच्या बाहेर जायला नको अन् बंद पडायला नको.
२. एच (H) पॅटर्नमध्ये वाहन चालविताना वाहन बंद पडता कामा नये.
३. चढण : वाहनचालकांना चढावर अथवा घाटात वाहन चालविता येईल की नाही, हे पाहण्यासाठी चढावर वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागते.
४. उतार : उतारावर वाहन चालविता येते की नाही, हे तपासले जाते.
या बाबी पडताळणार
१. ट्रॅकवर सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांद्वारे वाहनचालकांवर नजर ठेवली जाईल.
२. वाहन योग्य प्रकारे वळत आहे का?
३. ट्रॅकवरील रेषा किंवा सीमारेषा ओलांडली का?
४. वाहन मध्येच बंद पडते का?
‘‘पुण्यात दोन ठिकाणी ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टिंग सेंटर’ होणार आहे. त्याला परिवहन विभागाची मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.’’
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे