पुणेकरांसाठी चांगली बातमी! मेट्रोचा प्रवास आता होणार आणखी सुरक्षित
पुणे (Pune): मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखद करण्यासाठी पुणे मेट्रोतर्फे रामवाडी ते वनाज आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोमध्ये विशेष गस्त सुरू झाली आहे.
दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील संबंधित स्थानकावरील सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा कर्मचारी मिळून गस्त घालणार आहेत. यामध्ये मेट्रोत होणारे गैरप्रकार रोखणे, मेट्रो आणि स्थानक परिसरात कचरा टाकण्यापासून प्रतिबंध करणे, मेट्रोत खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखणे आदींचा समावेश आहे.
दोन्ही मार्गिकांवरील विविध स्थानकांदरम्यान दिवसातून किमान पाच ते सहा वेळा हे पथक नियमितपणे गस्त घालणार आहे. गस्तीवर असलेले सर्व कर्मचारी हे निश्चित गणवेशात असतील आणि आपल्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहतील, अशी माहिती पुणे मेट्रोतर्फे देण्यात आली आहे.
या गस्ती दरम्यान कोणताही प्रवासी गैरवर्तन करताना आढळल्यास त्याला मेट्रो नियमांनुसार दंड करण्यात येईल, तसेच गैरवर्तन हे कायदा सुव्यवस्थेच्या नियमाच्या आधीन असेल, तर त्या व्यक्तीला संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येईल.
या विशेष अभियानामुळे मेट्रोमधील प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण हेईल, असा विश्वास पुणे मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.