
पुणे (Pune) : निकृष्ट रस्त्याला खड्डे (Potholes) पडल्यानंतर ते खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा मोठे टेंडर (Tender) काढले जाते. त्यावर कळस म्हणजे, ते खड्डेसुद्धा निकृष्ट पद्धतीने बुजविले जात असतील तर... असा प्रकार नगर रस्त्यावर खराडी (Nagar Road Kharadi) येथे जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आला. शेवटी महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी चूक मान्य करीत ठेकेदाराची कानउघाडणी केली. (Pune Municipal Corporation News)
नगर रस्त्यावर खराडीतील दर्गा चौकात खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट आणि मनमानी पद्धतीने सुरू होते. खड्डे बुजवण्याकरिता असलेले नियम मोडून फक्त डांबर मिश्रित खडी जणू शिंपडावी अशा पद्धतीने खड्डे बुजविले जात होते. त्यामुळे काही वेळातच खडी रस्त्यावर पसरायला सुरवात झाली. त्यावरून काही वाहनचालक घसरले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिक दशरथ गद्रे यांनी जागेवर जाऊन माहिती घेतली.
त्यावेळी तेथे महापालिकेचे पथविभागाचे अधिकारी, ठेकेदार किंवा ठेकेदाराचा पर्यवेक्षक उपस्थित नव्हता. त्यानंतर 'सकाळ' मार्फत महापालिकेच्या पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव यांना निकृष्ट कामाचा व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यानंतर सूत्रे हलली. महापालिका अधिकाऱ्यांनी निकृष्ट काम झाल्याचे मान्य केल्याने ठेकेदाराला पुन्हा नव्याने काम करायच्या सूचना देण्यात आल्या.
नगर रस्ता परिसरात बुजवलेल्या खड्ड्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नितीन भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निकृष्ट काम पुन्हा चांगले करायला ठेकेदारास सांगितले आहे. दुपारी कार्यालयीन काम असल्यामुळे कामाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
अस्मिता कुटे, कनिष्ठ अभियंता, पथविभाग