मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आता होणार दहा लेनचा; उपमुख्यमंत्र्यांकडून गुड न्यूज

Expressway
ExpresswayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्ग सहाऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’च्या विचाराधीन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. विकएंडला प्रवासाला निघणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Expressway
Eknath Shinde : कामात हयगय करणारे अधिकारी, कंत्राटदारांवर कठोर कारवाई

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा शिंदे यांनी घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वांत अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरीत्या पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. हे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती बैठकीनंतर शिंदे यांनी दिली.

Expressway
Mumbai : कचरा वाहतुकीसाठी महापालिकेचे टेंडर लवकरच; कचऱ्याच्या वजनानुसारच ठेकेदारांना...

मुंबई-नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. मॉन्सूनपूर्व ज्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होणार नाही, त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील ३१ किलोमीटरचे काँक्रिटीकरण होणे अद्यापही बाकी आहे. तसेच, पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे, या कामांना तत्काळ गती द्यावी, कामे वेळेत पूर्ण करण्यास कंत्राटदार हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे, असेही सांगितले. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत; तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.

Tendernama
www.tendernama.com