.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune) : गेल्या तीन वर्षांपासून टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या येथील शेवाळेवाडी गावच्या पाणीप्रश्नाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेतली आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावून अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शेवाळेवाडी गावचा महापालिकेत समावेश होऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत. मात्र, अद्यापही गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील गल्लीबोळातील अरुंद रस्त्यातून टँकर जाऊ शकत नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
त्यातील अनेक ठिकाणी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी स्वखर्चाने जलवाहिनी टाकून त्याद्वारे घरापर्यंत टँकरमधील पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली. मात्र, ही व्यवस्था तात्पुरती आणि काही घरांपुरतीच मर्यादित आहे. याशिवाय हा पाणीपुरवठाही अपुरा आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत महापालिका आयुक्तांना शेवाळेवाडी गावच्या पाणीप्रश्नाबाबत कार्यवाही करण्याची सूचना दिली.
आयुक्त डॉ. भोसले यांनी नुकतीच ग्रामस्थ व पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींच्या तपासणीची सूचना दिली.
या वेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपअभियंता दत्तात्रेय टकले, राहुल शेवाळे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, विजय कोद्रे, विलास शेवाळे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, मंगेश शेवाळे, सिद्धार्थ शेवाळे आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांची कसरत लक्षात घेता, गावाला बंद नळाने पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यांनी तत्काळ महापालिका आयुक्तांना कार्यवाहीची सूचना केली होती. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून गावाला लवकरात लवकर बंद नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न लवकर सुटेल, अशी अपेक्षा आहे.
- राहुल शेवाळे, जिल्हा सरचिटणीस, भाजप
शेवाळेवाडी गावाला महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे नळातून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना गावचा सर्व्हे व अंदाज तयार करायला सांगितले. पुढील आठ दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर निधीची तरतूद केली जाईल. लवकरात लवकर गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यात येईल.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका