
पुणे (Pune) : काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरवात होताच रस्त्यांना पुन्हा खड्डे पडायला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी जेथे डांबरीकरण करून खड्डे बुजविले तेथेच पुन्हा खड्डे पडण्यास सुरवात झाल्याने निकृष्ट काम चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, निकृष्ट रस्तेप्रकरणी कारवाई करण्याचा विसर महापालिका प्रशासनाला पडला आहे.
पहिल्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. यानिमित्ताने महापालिका व ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर टीका झाल्याने दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांना खड्डे पडल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत डीएलपीतील १३९ रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यास त्रयस्थ संस्थेस सांगितले होते. त्यानुसार या संस्थेने अहवाल सादर केला आहे. महापालिकेने डीएलपीतील रस्त्यांना खड्डे पडल्याने पाच ठेकेदारांवर दंडात्मक करवाई केली आहे. पण केवळ त्यापैकी तीन जणांनीच पैसे भरले आहेत. त्यानंतर गेल्या आठवड्याभरात एकाही ठेकेदारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झालेली नाही.
दरम्यान दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू झाला, त्यामुळे पुन्हा खड्डे पडायला सुरवात झाली आहे. मध्यवर्ती पेठांसह नळस्टॉप, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, हडपसर, कोंढवा, मुंढवा, कात्रज कोंढवा रस्ता, औंध, वडगाव शेरी, विश्रांतवाडी या भागातील रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे गेले महिनाभर जे खड्डे बुजविले आहेत, त्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहे.
तीन ठेकेदारांनी भरला दंड
कात्रज येथील नॅन्सी लेक होम्स ते पद्मजा पार्क या रस्त्याला खड्डे पडल्याने मे एस. एस. कन्स्ट्रक्शनने १ लाख ३२ हजार ९९० रुपयांचा दंड ठोठावला होता. देसाई हॉस्पिटल मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने गणेश एंटरप्राइजेस कंपनीवर २ लाख ३० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. धायरी येथील श्री कंट्रोल चौक ते काळुबाई मंदिर रस्ता हे काम करणाऱ्या दीपक कन्स्ट्रक्शनला १० हजार रुपये दंड केला होता. या तीन ठेकेदारांनी दंडाची रक्कम भरली आहे.
‘‘शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत साडेआठ हजारपेक्षा जास्त खड्डे बुजविले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या पाच ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्रयस्थ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.’’
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग