पुणे (Pune) : शहरातील रस्ते झाडणे, कचरा संकलन पहाटेच सुरु होते. पण महापालिकेचे ठेकेदार त्यांच्याकडचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सकाळी आठ नंतर सुरु करत आहेत. त्यामुळे प्रकल्पांबाहेर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्याचा परिणाम शहरातील कचरा व्यवस्थापनावर होत असून, गाड्यांची वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे आता सकाळी सात वाजता कचरा प्रकल्प सुरु करण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आहेत.
शहरात रोज सुमारे २२०० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये सुका आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. घरोघरी निर्माण होणारा कचरा हा स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून संकलित केला होता. त्यानंतर कचरा वेचकांकडील कचरा महापालिकेच्या घंटागाडीतून रॅम्पपर्यंत नेला जातो. रॅम्पवरून मोठ्या ट्रकमध्ये कचरा भरून तो कचरा प्रकल्पांवर नेला जातो. सकाळी बाजारपेठ सुरु होण्यापूर्वी व रस्त्यावर वाहतूक कमी असताना शहरातील रस्ते स्वच्छ व्हावेत, कचरा उचलला जावा यासाठी महापालिकेची यंत्रणा पहाटेच काम सुरु करते. दुपारी एक दोन पर्यंत सर्व काम संपते. कचरा वेचकांच्या कामासोबत कचरा वाहतूकही सुरु होते. पण ठेकेदाराचे प्रकल्प सकाळी आठ, नऊ वाजता सुरु होत आहेत. त्यामुळे कचरा घेऊन जाणारी वाहने प्रकल्पाबाहेर उभी राहतात.
कचरा येऊन देखील ठेकेदाराकडून प्रकल्प सुरु केला जात नाही. एक गाडी दोन ते तीन तास रांगेत उभी असते, त्यामुळे शहरातील कचरा रॅम्पवर पडून राहात आहे. सर्व प्रक्रिया ठप्प होत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून याबाबत अधिकाऱ्यांनाकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदारांना पत्र पाठवून प्रक्रिया प्रकल्प सकाळी लवकर सुरु करा अशा सूचना घनकचरा विभागाच्या उपायुक्तांकडून देऊनही ठेकेदारांनी कामामध्ये सुधारणा केली नाही. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे आज (ता. २६) ठेकेदारांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ठेकेदार प्रकल्प उशिरा सुरु करत असल्याने निर्माण होणारी समस्या निदर्शनास आणून दिली. ठेकेदारांनी सात वाजता प्रकल्प सुरु करण्यासाठी नियोजन करावे व त्याची अंमलबजावणी त्वरित करावी असे बैठकीत सांगण्यात आले आहे.
जेवणासाठीही बंद केला जातो प्रकल्प
दुपारच्या जेवणासाठी प्रकल्प बंद करून सर्व कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जातात. त्यामुळे दुपारीही गाड्यांची रांग लागत आहे. जेवणाच्या सुट्टीत प्रकल्प बंद न करता काही जणांना कामावर ठेवून इतरांनी जेवायला जावे अशी व्यवस्था करा अशी सूचनाही दिली असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.