
पुणे (Pune) : ‘‘महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि उद्योगांमधील प्रदूषित पाणी इंद्रायणीत सोडले जाते. ते रोखण्यासाठी त्यांना निधी देणार असून, इंद्रायणीत शुद्ध केलेले पाणी सोडण्याच्या प्रकल्पाचे काम राज्य सरकारने यापूर्वीच सुरू केले आहे. इंद्रायणी स्वच्छतेची यंत्रणा आगामी काळात युद्धपातळीवर पूर्ण करू,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आळंदीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार शंकर जगताप, हेमंत रासने, अमित गोरखे व उमा खापरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, आचार्य तुषार भोसले, अक्षय भोसले, चैतन्य कबीर, संजय घुंडरे, शांताराम भोसले, किरण येळवंडे, राम गावडे, अॅड. आकाश जोशी, अशोक कांबळे, ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधीवर पंचोपचार पूजा केली. मंत्रपुष्पावली, स्वस्तीवाचन, आरती केली आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर देवस्थानच्या कार्यालयात फडणवीस यांच्याशी देवस्थानच्या विश्वस्तांनी दर्शनमंडप भूसंपादन आणि गायरानातील प्रस्तावित प्रकल्प ज्ञानभूमी प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी, याबाबत विश्वस्त, जिल्हाधिकारी आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर होळ यांच्याशी एकत्रित चर्चा करा. त्यानंतर सविस्तरपणे सर्व नियोजन मार्गी लावू, असे आश्वासन देवस्थानला दिले.
पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली. माउलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. प्रत्येकाकरिता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत हा वारकरी विचाराने महाराष्ट्र पुढे गेला आहे. भविष्यातही पुढे जात राहील. या विचारांची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी, यासाठी आम्ही रिचार्ज होण्यासाठी आळंदीसारख्या ठिकाणी येत असतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री