
पुणे (Pune) : सतत पडणारा पाऊस, वाहतूक कोंडी आणि बंद पडणाऱ्या बस अशा कारणांमुळे पीएमपीची दमछाक झाली आहे. दिवसाला किमान ४० बस रस्त्यातच बंद पडत असल्याने अनेक फेऱ्या रद्द होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांचे प्रमाणही कमी होत आहे. काही मार्गांवर तर गाड्यांना दोन तासांपेक्षा जास्त उशीर होत आहे. परिणामी पीएमपीचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
बस रस्त्यातच बंद पडल्यानंतर प्रवाशांना पावसातच दुसऱ्या बसची वाट बघावी लागते. अन्यथा त्यांना पर्यायी वाहन मिळवावे लागले. पीएमपीची सूत्रे असताना ओमप्रकाश बकोरिया यांनी कडक उपाययोजना केली होती. एका महिन्यात तीन वेळा ब्रेकडाऊन झालेली बस काही दिवसांसाठी प्रवासी सेवेतून बाहेर काढली जात असे. संबंधित बसच्या ठेकेदाराला आर्थिक दंड ठोठावला जात असे. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले होते. लागू पडलेली ही मात्रा बंद करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळ्यात बस बंद पडण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. १७ ते २६ जुलै दरम्यान ४५८ बस बंद पडल्या.
आयुर्मान संपलेल्या गाड्या
पीएमपी रोज सुमारे १२ लाख प्रवाशांना सेवा देते. त्यासाठी सुमारे १६५० बस धावतात. यात दहा वर्षांचे आयुर्मान संपलेल्या सुमारे ३२७ बस आहेत. याशिवाय सुमारे २०० बस १२ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत. अशा बस प्रवासी सेवेतून तातडीने बाहेर काढण्याची गरज आहे, मात्र मुळात बसची संख्या कमी असल्याने प्रशासनाला आयुर्मान संपलेल्या बसमधून प्रवासी वाहतूक सुरु ठेवावी लागत आहेत. हेच समस्येचे मुळ आहे.
प्रमुख मार्गांवरील कोंडीचा फटका
पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, डेक्कन आदी मार्गांवरून जाणाऱ्या बसना वाहतूक कोंडीचा फटका बसतो.
पाऊस, वाहतूक कोंडीमुळे बसच्या फेऱ्यांवर व वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. काही मार्गांवरील गाड्यांना दीड ते दोन तास उशीर होत आहे. गाड्या वेळेवर धावाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे