
पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे ‘पुणे कारागृह शिपाई भरती २०२२-२३’ प्रक्रिया गेल्या दहा महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे पोलिस भरतीला पात्र असलेले साधारण एक लाखापेक्षा अधिक उमेदवार हवालदिल झाले आहेत. या भरतीमध्ये ५१३ जागांसाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज भरण्यात आले आहेत.
राज्याच्या गृहमंत्रालयाद्वारे जानेवारी २०२४ मध्ये १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती घेण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याअंतर्गत राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीची जाहिरात काढण्यात आली. त्यानुसार १ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे ५१३ जागांसाठी ‘पुणे कारागृह शिपाई भरती २०२२-२३’ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीला प्रतिसाद देत राज्यातील साधारण एक लाख ३० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांना प्रशासनाकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. तसेच पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय असेल या बाबतही काही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित उमेदवार हवालदिल झाले आहेत.
उमेदवार म्हणतात...
- मार्च २०२४मध्ये पुणे शहर पोलिस भरतीचीदेखील जाहिरात प्रसिद्ध झाली होती
- या भरतीला अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मैदानी चाचणी, लेखी परिक्षा, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणी झाली
- या उमेदवारांचे प्रशिक्षणदेखील सुरू झाले आहे
- ‘पुणे कारागृह शिपाई भरती २०२२-२३’ची कोणतीच प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही
- पुणे कारागृह पोलिस भरती वगळता महाराष्ट्रातील सर्व पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
- त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत
संपर्क शक्यच नाही
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे मार्च २०२४ राजी ‘पुणे कारागृह शिपाई भरती २०२२-२३’ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या संदर्भात कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने विद्यार्थ्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर कॉलच कनेक्ट होत नाहीत. त्यामुळे यासंदर्भात अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संपर्कच शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
मागील काही महिन्यांत निवडणूक आचारसंहिता होती. तसेच, भरती प्रक्रियेसाठी टेंडर मागविण्यात आले होते. परंतु पुरेसे टेंडर प्राप्त न झाल्याने पुन्हा टेंडर मागविण्यात आले. ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या २६ जानेवारीनंतर कारागृह पोलिस भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
- अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त, प्रशासन
मागील वर्षी मार्च महिन्यात अर्ज भरला होता. परंतु अजूनही कोणतीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जवळपास ११ महिन्यांपासून मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काहीच माहिती मिळत नाही, भेटायला गेलो तर, अधिकारीही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काय करावे, हे समजत नाही.
- पोलिस भरती उमेदवार
पुणे शहर पोलिस भरतीमध्ये अंतिम निवड झाली नाही म्हणून पुणे कारागृह पोलिससाठी तयारी करत आहे. पुन्हा एकदा पोलिस भरती होणार आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु आता पुणे कारागृहाची तयारी करायची की येणाऱ्या नवीन पोलिस भरतीची असा संभ्रम निर्माण झाला आहे.
- पोलिस भरती उमेदवार
या भरतीसाठी एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत आणि त्यावर गेल्या ११ महिन्यांपासून कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि मैदानी चाचणीचे नियोजन करता येईल.
- विठ्ठल बडे