सोलापूर (Solapur) : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी चार मजली दर्शन मंडप, स्कायवॉक तसेच दर्शनाची सुविधा तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने केली जाणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून शंभर कोटींच्या आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तत्काळ मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीसमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. लवकरच या आराखड्याचे सादरीकरण होणार आहे.
त्यानंतर शिखर समितीपुढे सादरीकरण होऊन याबाबत शासन निर्णय काढला जाणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार आहे. आषाढी वारी कालावधीत पत्रा शेडच्या माध्यमातून तात्पुरती सुविधा निर्माण केली जाते. यासाठी प्रतिवर्षी दोन ते तीन कोटींचा खर्च मंदिर प्रशासनाला येतो. तरीही त्या प्रमाणात भाविकांना सुविधा मिळत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतची कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतली आहे. आषाढीवारीत शासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जातो. यावर्षी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी दहा कोटी तर पंढरपूरसह पालखी मार्गावारील नगरपरिषदांसाठी दहा कोटी असा वीस कोटींचा निधी मिळाला आहे. हा निधी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस, व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा राहिला आहे. मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करण्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे, बांधकाम विभागाचे अधिकारी, पंढरपूरसह अकलूज, माळशिरस, नातेपुते येथील नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मंदिर समिती यांच्यात योग्य समन्वय व योग्य नियोजन दिसले. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत दरवर्षी पेक्षा जास्त भाविक येऊनही यंदाची आषाढी एकदशी सर्वच पातळ्यांवर कमालीची यशस्वी झाली.
सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशापासून सर्व स्तरातून पोलिस व महसूल प्रशासनाकडून यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. पंढरपूर स्वच्छता यावर्षी नक्कीच चांगली झाली आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेवर फार लक्ष दिले आहे. यंदा पालखी सोहळ्यामध्ये प्रशासनाचे सहकार्य व मदत मिळाली. ही वारी कायम स्मरणात राहील.
- श्री. योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संस्थान
सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अडचणी होत्या. रस्ता, पालखी तळ यांचे प्रश्न होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांचे टिम यांनी अतिशय चांगले काम केले. पालखी तळावर चांगली सोय झाली. या वर्षी पंढरपूरमध्ये उच्चांकी गर्दी होती. प्रशासनाने कुशलतेने उत्तम नियोजन केले.
- श्री. माणिक गोविंद मोरे, पालखी सोहळा प्रमुख, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान
पंढरपूरसोबत लाखो भाविकांच्या श्रद्धा जोडल्या आहेत. येथे आलेल्या भाविकांना कायमस्वरूपीच चांगल्या सेवा व सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यंदाच्या आषाढीसाठी मी स्वत: पंढरपुरात सात दिवस मुक्कामी होतो. पालखी सोहळ्यातील प्रमुख, पत्रकार, पंढरपूरची माहिती असलेले अनुभवी नागरिक यांच्याशी आम्ही चर्चा केली. स्वच्छतागृह व्यवस्थित रहावेत यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे सुपरवायझर, शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकारी यांच्याशी दोन ते तीन बैठका घेतल्या. त्याचा चांगला परिणाम या वर्षी दिसला.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
ठळक कामगिरी
- ड्रोन कॅमेरा व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस होते दक्ष
- वारकऱ्यांना १५ लाख पाणी बॉटल व मँगो ज्यूसचे वाटप
- वारीचा मुक्काम संपला की तात्काळ स्वच्छता मोहीम
- यात्रा कालावधीत पंढरपुरात उचलला रोज ७० ते ८० टन कचरा
- रुग्णवाहिकेव्दारे १४३७ गंभीर रुग्णांना अत्यावश्यक सेवेचा लाभ