
Rankala Lake
Tendernama
कोल्हापूर (Kolhapur) : येथील ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचे टेंडर आज (शनिवार) प्रसिद्ध करण्यात आले. राज्य सरकारकडून आलेल्या ९ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून ही कामे केली जाणार आहेत, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे २९ ऑक्टोबर २०२१ ला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर त्यांनी रंकाळा तलावाची पाहणी केली. तलावाचे सुशोभीकरण करून शहरांमध्ये पर्यटन स्थळ विकसित करण्यासंदर्भात त्यांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने सुशोभीकरणाचा आराखडा बनवून तो नगरविकास खात्याला पाठवला होता.
क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून मंत्री शिंदे यांच्याकडून १५ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यातील ९ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे वर्ग झाला. निधी वर्ग होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप सुशोभीकरणाच्या कामाचे टेंडर निघाले नव्हते. गेल्या आठवड्यात क्षीरसागर यांनी महापालिकेत बैठक घेऊन टेंडर काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सुनावले. काम वेळेत सुरू झाले नाही तर निधी परत जाईल त्यामुळे तत्काळ टेंडर प्रक्रिया राबवा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आज या कामाचे टेंडर प्रसिद्ध झाले.
सुशोभीकरणातील कामे :
- पाण्यालगत सेटिंग डेक.
- प्रवेशद्वार व पाच कमानी.
- स्केटिंग ट्रॅक
- पदपथालगत कॉंक्रिट बेंच.
- आउटडोर गेम्स.
- विद्युत रोषणाई.
- पदपथ गार्डन व कव्हर स्टेज.
- दुचाकी, चारचाकीसाठी पार्किंग