.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : सोलापूर होटगी विमानतळावरून (Solapur Airport) विमानसेवा सुरू करण्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया राबविण्यात आली आहे. टेंडर भरण्यासाठी अंतिम मुदत २४ ऑक्टोबरपर्यंत असल्याने विमान कंपन्यांकडून विमानतळ पाहणीला सुरवात झाली आहे.
विमानतळाच्या उद्घाटनानंतर इंडिगो (Indigo) आणि फ्लाय ९१ या दोन कंपन्यांनी पाहणी केली असून एलायन्स एअर आणि स्टार एअरलाइन्स या कंपन्यांकडूनही पाहणी होणार आहे. (Solapur Airport News)
होटगी रोड विमानतळाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण २९ सप्टेंबर रोजी झाले. उद्घाटनाच्याच दिवशी इंडिगो विमान कंपनी आणि सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) फ्लाय ९१ या दोन कंपन्यांकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली.
अद्याप २४ ऑक्टोबरपर्यंत टेंडरची मुदत असल्याने एलायन्स एअर आणि स्टार एअरलाइन्स या दोन कंपन्यांकडूनही पाहणी होणार आहे. विमानसेवेला मिळणारा प्रतिसाद, किती शहरांमध्ये प्रवासी सेवा देऊ शकणार, शहराची आर्थिक स्थिती, शहरातील व्यापार आदी आर्थिकस्तरावर चाचपणी विमान कंपन्यांकडून सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रवाशांची क्षमता तपासणीसाठी रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांची माहिती घेण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावर विमानसेवेसाठीचा अहवाल तयार करून त्यानुसार कंपनीकडून विमानतिकीटाचे दर ठरविले जाणार आहेत. त्यात राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान आणि प्रत्यक्षात प्रवाशांना लागू होणारे तिकीट दर निश्चित होणार आहेत.
'या' मार्गांची होतेय चाचपणी
सोलापूर - मुंबई आणि सोलापूर - पुणे या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत. मात्र सोलापुरातील प्रवाशांचा कल आणि विमान कंपन्यांना परवडेल अशा मार्गांची चाचपणी केली जात आहे.
त्यामध्ये सोलापूर - बंगळूर, सोलापूर - तिरुपती, सोलापूर - हैदराबाद, सोलापूर - अहमदाबाद, सोलापूर - दिल्ली आणि सोलापूर - गोवा आदी मार्गही सुचविण्यात आले आहेत.