.jpg?rect=0%2C1%2C1640%2C923&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : सोलापूर शहराचे टेक्स्टाईल्स पार्क ही ओळख असलेली अक्कलकोट रोड वसाहत पुन्हा वैभवाला न्यायची असेल तर ही वसाहत महापालिकेकडून एमआयडीसीकडे हस्तांतरीत करणे हा एकमेव उपाय आहे.
त्यातून एक हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल, या वसाहतीतून वाढू शकते. तसेच किमान पाच हजार लोकांना नव्याने रोजगार मिळू शकतो. विशेष म्हणजे सुरक्षित औद्योगिक वसाहतीमध्ये महिलांना अधिक रोजगार मिळेल.
मागील काही वर्षापासून ही औद्योगीक वसाहत महापालिकेने हस्तांतरित करून घेतली. पण तेथे कोणतीही सुविधा देण्याची तयारी केली नाही. तसेच उद्योगांच्या गरजा पुरवण्याचा कोणताही अनुभव महापालिकेकडे नाही. यापूर्वी केंद्राचे वस्त्रोद्योग खात्याचे सचिव आर. सी. रेड्डी यांनी ४० कोटींची योजना वसाहतीसाठी दिली होती. नियमानुसार २५ टक्के हिस्सा महापालिकेने दिला नाही, त्यामुळे ही योजना बारगळली.
अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण नसल्याने अनेक वेळा आगीत उद्योगांचे मोठे नुकसान झाले. वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक होता. पण महापालिकेला त्याची उभारणी करता आली नाही. शेवटी एमआयडीसीने प्लांट उभारून दिला. देशातील खरेदीदारांनी वसाहतीला भेट दिली तेव्हा त्यांनी वसाहतीत रस्ता नाही, तर माल येऊ शकत नाही म्हणून लाखो रुपयांच्या ऑर्डर रद्द केल्या. ही स्थिती पाहता हस्तांतर हा एकमेव टेक्स्टाईल उद्योग विकासाचा उपाय आहे.
काय होऊ शकते
- उद्योग मित्र कमिटीमध्ये याबाबतचा प्रस्ताव गेला आहे, त्यास उद्योगमंत्र्यांनी मान्यता द्यायला हवी
- स्थानिक आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून आदेश आणल्यास प्रश्न सुटणे शक्य
- महापालिकेने शहराच्या औद्योगीक हितासाठी एमआयडीसीकडे बिनशर्त हस्तांतर करावे
हस्तांतराने काय साधले जाऊ शकते
- एमआयडीसी जागेची मालक असल्याने सहज हस्तांतर शक्य
- वसाहतीतील उद्योगाची उलाढाल एक हजार कोटीने वाढू शकते
- उद्योगांची संख्या व क्षमता वाढून एक हजारापेक्षा अधिक लोकांना नवा रोजगार
- बाहेरील मोठ्या गुंतवणूकदारांना थेट गुंतवणुकीची संधी देता येईल
- सोलापूर शहराची औद्योगीक ओळख वाढेल
- नव उद्योजकांना प्लग ॲण्ड स्टार्ट पद्धतीने थेट उद्योग सुरू करता येतील
- वसाहतीला लागणारे पाण्याचे आरक्षण धोरण ठरून उद्योगांना योग्य गुणवत्तेचे पाणी मिळेल
- उद्योगांच्या गरजा ओळखून एमआयडीसी वीज पुरवठ्याचे धोरण ठरवेल
- मोठ्या उद्योजकांना वसाहत व कामगार वसाहती दाखवून गुंतवणूक मिळवता येईल
- अग्निशमन दल, कामगारांची सुरक्षा, औद्योगीक गुणवत्तेचे पाणी, उच्च दाबाचा वीज पुरवठा मिळणे शक्य
हस्तांतर न केल्यास काय होईल?
- वसाहतीतील उद्योग कमी होत जाणार
- महापालिकेला देखभालीसाठी सातत्याने निधी देणे अशक्य
- उद्योगांना मूलभूत सुविधा कायमस्वरूपी मिळणे अशक्य
- उत्पादन निर्मिती व निर्यातीच्या संधी घटणार
- कामगारांची संख्या घटणार
- बाहेरील गुंतवणूकदार व खरेदीदारांचे व्यवहार होणार अशक्य
- औद्योगीक वसाहत आजारी पडून कायमची बंद पडू शकते
- शहराचा उद्योग विकासाचा चेहरा कायमचा संपणार
- शहरातील रोजगार निर्मितीला थेट फटका