

सातारा (Satara): सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील चार नदीपात्रांतील दहा वाळू ठिय्यांची लिलाव प्रक्रिया सुरू होती. मात्र, सात ठिय्यांना बोलीच न मिळाल्याने त्यांची ई-लिलाव प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. तीन ठिय्यांना बोली मिळाली आहे. त्यामुळे सर्व ठिय्यांची एकत्रित लिलाव करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.
२४ हजार ३३४ ब्रास वाळू लिलावातून १.३१ कोटींचा महसूल अपेक्षित होता. मात्र, बोली न मिळाल्याने गौणखनिज विभागाने पुन्हा ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
वाळू लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याने महसूल प्रशासनास दुसऱ्यांदा ई-लिलाव प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यामुळे चांगल्या महसुलाची अपेक्षा यावेळेस तरी पूर्ण होणार का? याची उत्सुकता आहे. पहिल्या लिलाव प्रक्रियेत बोली न मिळाल्याने सात ठिय्यांची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.
ई-निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे सुरू झाले आहे. सहा जानेवारीपर्यंत इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आठ जानेवारीला निविदाधारकांचे तांत्रिक लिफाफे उघडले जातील. १५ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत ई-लिलाव प्रक्रिया सुरू राहणार आहे.
वेळ संपण्याच्या दरम्यान बोली आल्यास संगणकीय प्रणालीद्वारे प्रत्येकी दहा मिनिटे वाढ केली जाणार आहे. साडेतीन वाजता लिलाव बोली उघडण्यात येतील.
दुसऱ्यांदा होणाऱ्या सात ठिय्यांच्या लिलावामध्ये कऱ्हाड तालक्यातील काले येथील दक्षिण मांड नदीतील ४३१४ ब्रास वाळूचा लिलाव होणार असून, त्यांची किंमत २३ लाख २९ हजार ५६० आहे. वाठार येथील १४७० ब्रास वाळू असून, त्यांची किंमत सात लाख ९३ हजार ८०० रुपये आहे. भूखंड तीनमध्ये २५४४ ब्रास वाळू असून, त्याच्या किमती १३ लाख ७३ हजार ७६० रुपये आहे.
कोरेगाव तालुक्यातील वांगना नदीतील १८०२ ब्रास वाळूचा लिलाव होत असून, त्याची किंमत नऊ लाख ७३ हजार आहे. माण तालुक्यातील बिदाल येथील माणगंगा नदीतील २४७३ ब्रास वाळूचा लिलाव होणार असून, त्यांची किंमत १३ लाख ३५ हजार ४२० आहे. येथील भूखंड क्रमांक चारमधील १५५५ ब्रास वाळूची किंमत आठ लाख ३९ हजार ७०० रुपये आहे.
बिदालमधील भूखंड क्रमांक सहामधील २२०८ ब्रास वाळूची किंमत ११ लाख ९२ हजार ३२० रुपये आहे, तसेच ६२३६ ब्रास वाळूची किंमत ३३ लाख ६७ हजार ४४०, १६ हजार ३६६ ब्रास वाळूची किंमत ८८ लाख ३७ हजार ६४० रुपये आहे.