
सातारा (Satara) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील काही वर्षांत मेट्रो शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस (E Bus) सुरू झाल्या आहेत. आता निमशहरी व ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बसची सेवा पोचणार असून, प्रवाशांना वातानुकूलित आरामदायी प्रवास घडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सात डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. ई-बस सुरू झाल्यानंतर प्रदूषण देखील कमी होणार आहे.
पर्यावरणपूरक आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे. त्यासाठी राज्याचा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळासाठी नवीन पाच हजार १५० ई-बस खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ई-बस खरेदीची प्रक्रिया सुरू झाली.
एसटी महामंडळाने पाच हजार १५० ई-बसचे टेंडर काढले. या बससाठी महामंडळाने १०१ डेपोंमध्ये १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. मागील सहा महिन्यांत मुंबई-पुणे, पुणे-नाशिक, कोल्हापूर-पुणे यासह अन्य मार्गांवर ई-बस धावत आहे. ई-बस सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातील त्रुटी दूर झाल्याने आता सुस्थितीतील बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
ई-बसची वैशिष्ट्ये
- स्वयंचलित दरवाजे
- सुमारे ३०० किलोमीटर धावणार
- बस पूर्णपणे वातानुकूलित असणार
- सीसीटीव्ही कॅमेरे
- चार्जिंग सुविधा
सात ठिकाणी प्रस्तावित चार्जिंग स्टेशन
सातारा, कऱ्हाड, पाटण, दहिवडी, फलटण, वाई, वडूज.
पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनाही फायदा
राज्यात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्यांमध्ये सातारा-पुणे विनाथांबा मार्ग आहे. या मार्गावर नुकत्याच दहा नवीन बस आल्या आहेत. मात्र, आधीच बसची संख्या अपुरी असल्याने नवीन बस इतर मार्गावर सोडल्या जातात. ई-बस दाखल झाल्यानंतर या बस सातारा-पुणे मार्गावर सोडल्यास प्रवाशांना आरामदायी प्रवास घडेल.
जिल्ह्यातील सात डेपोंमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासाठी दोन ठिकाणी जागा निश्चितीचे काम अंतिम टप्यात आले असून, उर्वरित पाच ठिकाणी जागेची ठिकाणे अंतिम झाली आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, सातारा