
सोलापूर (Solapur) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीअखेरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका व नगरपालिकांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांची सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. डिसेंबरपर्यंत संबंधित यंत्रणांनी कार्यारंभ आदेश द्यावेत. ज्या यंत्रणेकडे २०२२-२३ मधील निधी शिल्लक आहे त्यांनी ऑक्टोबरअखेर कार्यारंभ आदेश देण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या शिफारशी/सूचना, सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. महापालिका व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विकासाची एखादी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवावी. त्या भागातील नागरिकांना त्या विकासाचा लाभ मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अथवा सीएसआर फंडातून उपलब्ध करण्यात येईल.
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी मार्च २०२३ अखेरच्या खर्चाचा तपशील सादर केला. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्च २०२३ अखेरचा खर्च ५२६.८१ कोटी. अनुसूचित जाती उपयोजना मार्च २०२३ अखेरचा खर्च १५०.६५ कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना मार्च २०२३ अखेरचा खर्च ४.२१ कोटी. याप्रकारे २०२२-२३ मध्ये सोलापूर जिल्ह्याने ९९.८५ टक्के खर्च केल्याचे सांगितले. २०२३-२४ अंतर्गत सर्वसाधारण योजना ५९० कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना १५१ कोटी तर आदिवासी उपयोजना ४ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर असल्याचे सांगितले.
विठ्ठल मंदिराची प्राचीन शैली जपण्यास मदत
पंढरपूर मंदिर देवस्थान आराखड्यांतर्गत विठ्ठल मंदिर संकुल जतन, संवर्धन व परिसर व्यवस्थापनासाठी ७३ कोटी ५५ लाखांचा आराखडा मंजूर झाला आहेत. त्यातील ३२ कोटी ७९ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता व टेंडर प्रक्रिया झाली आहे. उर्वरित कामांची अंदाजपत्रके तयार असून ती कामेही प्रशासकीय मान्यता स्तरावर आहेत. आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. त्याद्वारे मंदिराची प्राचीन शैली जपण्यास मदत होईल, भाविकांनाही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
दांडी मारणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना नोटीस
पालकमंत्री पाटील पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली होती. आजच्या बैठकीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक विनापरवाना गैरहजर राहिले होते. बैठकीस अनुपस्थित राहिल्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.