15 हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव; ‘पवित्र’द्वारेच भरती

Jobs
JobsTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

Jobs
Pune : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मिशन-15’ मोहीम नक्की आहे तरी काय?

तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील २३ हजार शिक्षकांचीच भरती झाली आहे. झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे. नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jobs
Pune : महापालिकेच्या अनियंत्रित कारभारामुळे टँकरलॉबी फोफावलीय का?

‘खासगी’तील भरतीवेळी ‘शिक्षण’चा असेल प्रतिनिधी

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे. पण, या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. त्यामुळे खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे.

कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह

राज्यातील जिल्हा परिषदांच्या १५ हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये डीएड, बीएडधारक तरुण-तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे. पण, आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक भरतीचे असे नियोजन

रिक्त पदभरतीची टक्केवारी

८० टक्के

खासगी शाळांमधील रिक्तपदे

८,२००

झेडपी शाळांमधील रिक्तपदे

६,८००

एकूण शिक्षक भरती

१५,०००

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com