सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनात वाढ व्हावी, यासाठी धार्मिक पर्यटन स्थळे जोडणे आवश्यक आहे. शिखर शिंगणापूर व तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या नव्या महामार्गाची मागणी होत असून, नियोजित महामार्गात समाविष्ट होणारे रस्ते शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे असल्याने यासाठी एकत्रित प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. मात्र, मंजुरीपूर्वीच हा मार्ग वादात सापडला आहे.
शिखर शिंगणापूर व तुळजापूर ही महाराष्ट्रासह महाराष्ट्रबाहेरील अनेकांची कुलदैवते आहेत. कोजागरी पौर्णिमेला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी जातात. तर चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरची यात्रा भरते. या यात्रेला कावड व काट्या घेऊन भाविक पायी जातात. या भाविकांसाठी कावड-काट्या मार्ग अस्तित्वात यावा, अशी खूप दिवसांपासून मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सुरवातीला शिवाजी कांबळे यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामार्फत दिले.
तुळजापूर -वैराग -माढा- उपळाई- बावी -मोडनिंब- करकंब -श्रीपूर -अकलूज- शिंगणापूर असा महामार्ग या निवेदनात नमूद केला होता. त्यानंतर खासदार नाईक-निंबाळकर यांनी संजय कोकाटे यांच्या मागणीवरून तुळजापूर- वैराग- माढा- जाधववाडी - चिंचोली - भुताष्टे - पडसाळी- भेंड- व्हेळे- वरवडे- परिते- बेंबळे- वाफेगाव (ता. माळशिरस)- शिंगणापूर असा नवा मार्ग मंजूर करावा, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.
भाई एस. एम. पाटील यांच्या पत्रामुळे उड्डाणपुलाचे रुंदीकरण
भविष्यात होणाऱ्या शिंगणापूर -तुळजापूर या महामार्गासाठीच सोलापूर - पुणे महामार्गावर विरवडे येथे सुरवातीला तयार केलेला साडेतीन मीटर रुंदीच्या उड्डाणपुलाचे काम बंद पाडून त्याऐवजी साडेचार मीटर रुंदीचा उड्डाणपूल तयार करावा, असे पत्र (स्व.) माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांनी दिले होते. त्याप्रमाणे साडेचार मीटर रुंदीचा उड्डाणपूल विरवडे येथे या महामार्गाठी तयार करण्यात आलेला आहे.
दोन्ही मार्गातील अंतरात फारसा फरक नाही. हा विषय अंतराचा नाही, तर श्रध्देचा आहे. कारण अनेक दशके कावड-काठ्या तुळजापूर- वैराग- माढा- जाधववाडी -चिंचोली - भुताष्टे - पडसाळी- भेंड- होळे - वरवडे- परिते- बेंबळे- वाफेगाव- माळशिरस -शिंगणापूरला जात आहेत. सध्या हा मार्ग मंजूर नसला तरी विचाराधीन आहे.
- अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, विरवडे
तुळजापूर- शिखर शिंगणापूर हा मार्ग मोडनिंबमार्गे झाल्यास दळणवळण वाढल्याने उद्योग धंदे आणि व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शिवाय मोडनिंब येथे मंजूर असलेले रेल्वेचे कार्गो टर्मिनल, नव्याने सर्वेक्षण सुरू झालेली एमआयडीसी यासाठी या मार्गाचा फायदा होणार आहे.
- राहुल केदार, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, मोडनिंब
तुळजापूर ते शिंगणापूर सर्वात जवळचा मार्ग
मागणी करण्यात आलेले लऊळ - पडसाळी- भेंड किंवा उपळाई- बावी - मोडनिंब - करकंब या दोन्ही मार्गाचे तुळजापूर ते शिंगणापूर हे अंतर अंदाजे १७५ किलोमीटर पेक्षा अधिक असून शकते. तर तुळजापूर- काटी - शेळगाव - कौठाळी - वाळूज - देगाव - अनगर - मोडनिंब - करकंब - श्रीपूर - अकलूज - शिंगणापूर हा मार्ग १६४ किलोमीटर इतक्या अंतराचा आहे. हाच मार्ग काही ठिकाणी ग्रीनफिल्ड केल्यास हा मार्ग यापेक्षा कमी अंतरात व कमी खर्चात होऊ शकतो. कारणांमुळ मार्गाच्या रुंदीकरणापेक्षा नवे भूसंपादन कमी खर्चात होऊ शकते. यामुळे या जवळच्या मार्गाचा विचार करणे अधिक फायद्याचे आहे. वाद सुरू असलेल्या दोन्ही मार्गापेक्षा हा मार्ग जवळचा व सरळ आहे.