बार्शी (Barshi) : अनेक वर्षे रखडलेल्या बार्शी-तुळजापूर रस्त्याच्या कामाला सरकारने मंजुरी दिली असून टेंडरही प्रसिद्ध केले आहे. राज्याचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून रस्त्यासाठी सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
तालुक्यातील सरकारच्या विविध योजनांचा माध्यमातून तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बार्शी येथे जगातील एकमेव मंदिर ग्रामदैवत अंबरीष वरद श्री भगवंत मंदिर असून मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. येथून कोजागरी पौर्णिमे निमित्ताने लाखो भाविक तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी चालत जातात. दोन्ही तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या बार्शी-तुळजापूर रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने भाविक, पर्यटकांसह रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांची मोठी गैरसोय होत होती. रस्त्याच्या कामामुळे बार्शी, शेलगाव, महागाव, मळेगाव, जामगाव पा, उपळे दुमाला, गौडगाव, संगमनेर, तुळजापूर आदी गावांसह परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.
रस्ता सोलापूर व धाराशिव दोन जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. किमी ५/८०० ते किमी ४२/६०० ही लांबी बार्शी तालुक्यातील असून किमी ४२/६०० ते ५२/००० लांबी तुळजापूर तालुक्यातील आहे. रस्त्यावर बार्शी, तुळजापूर आदी महत्त्वाची धार्मिक, पर्यटन व ऐतिहासिक क्षेत्राशी संबंधित गावे आहेत. रस्त्याची रुंदी १० मीटर असून दोन्ही बाजूस १ मीटर रुंदीची बाजू पट्टी होणार आहे. रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले.