Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

Pandharpur : मुख्यमंत्री शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तुळशी वृंदावनाच्या कामात घाईगडबड

Published on

पंढरपूर (Pandharpur) : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात अनेक कामांचा झपाटा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या येथील तुळशी वृंदावनाचे काम अत्यंत घाईगडबडीत सुरू करण्यात आले आहे. येत्या आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तुळशी वृंदावनाचे लोकार्पण करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. दरम्यान, हे काम गडबडीत सुरू असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या तुळशी वृंदावनाच्या कामासाठी इतकी घाई का? असा प्रश्न पंढरपूर शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde
Mumbai : वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोड प्रकल्प: पायाभूत कामे करताना नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे प्रमुख नेताजी पवार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी उशिरापर्यंत भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पंढरपूर शहरातील सावरकर चौकात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागेत तुळशी वृंदावनाचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसामध्ये रात्रंदिवस हे काम सुरू आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेच. शिवाय अत्यंत घाईगडबडीत हे काम उरकण्यात येत आहे. विटांचे काम केल्यानंतर किमान आठ दिवस पाणी मारणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता घाईने संपूर्ण काम उकरण्यात येत आहे.

Eknath Shinde
Solapur : 'या' ठिकाणी नवीन एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा; उद्योगमंत्री सामंत यांची मंजुरी

तुळशी वृंदावनाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात स्वनिधी दिली आहे. तर उर्वरित निधी हा नगरपालिकेकडून दिला जाणार आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. येथील तुळशी वृंदावनाच्या कामाला स्थानिक दुकानदारांनी विरोध केला आहे. त्यांच्या विरोधानंतरही नगरपालिकेने कोणतीही निविदा प्रसिद्ध न करता हे काम सुरु असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या हे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याची तक्रार देखील काही स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे घाईत सुरू असलेले काम थांबवून वारीनंतर चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

Tendernama
www.tendernama.com