

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ठाणे जिल्ह्याच्या क्षितिजावर मोठे आणि निर्णायक बदल घडणार आहेत. ठाण्यातील दिवाजवळ म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे महत्त्वाचे स्थानक उभारले जात असताना, या स्थानकाच्या लगतच तब्बल 1300 एकर जागेत मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)च्या धर्तीवर एक अत्याधुनिक आणि विशाल नवे बिझनेस हब विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली गेली आहे.
हे व्यावसायिक केंद्र ठाणे आणि आसपासच्या परिसरासाठी भविष्यातील आर्थिक विकासाची आणि रोजगाराच्या अमाप संधींची नांदी ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनचे म्हातार्डी येथील स्थानक हे केवळ बुलेट ट्रेनसाठी नसेल. ते एक एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. हे केंद्र बुलेट ट्रेन सोबतच रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडणार आहे. यामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणाहून विविध वाहतूक पर्यायांचा वापर करणे सोयीचे होणार आहे. हे वाहतूक केंद्र, प्रस्तावित बिझनेस हबच्या अगदी जवळ असल्याने, 'कनेक्टिव्हिटी' म्हणजेच दळणवळणाच्या बाबतीत हे केंद्र मुंबई आणि परिसरासाठी सर्वोत्तम ठरणार आहे.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या परिसरासाठी स्थानिक क्षेत्र आराखडा तयार करत आहे. "आम्ही ज्या नवीन व्यावसायिक जिल्ह्याची योजना आखत आहोत, ती वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपेक्षाही अधिक प्रगत असेल," असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली असून, हा विकास जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायकाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तराच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक नियोजन या बिझनेस हबमध्ये अपेक्षित आहे.
हा भव्य प्रकल्प ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या हद्दीतील १३०० एकरवर विस्तीर्ण जागेत पसरलेला आहे. दातिवली, म्हाडतार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद, काटई यासारख्या गावांच्या परिसराचा यात समावेश आहे.
ठाणे महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायदा, 1966 अंतर्गत या विकासासाठी पहिली अधिसूचना प्रसिद्ध केली असून, स्थानिक विकास आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. या 1300 एकरच्या बिझनेस हबमुळे ठाणे जिल्ह्यासाठी भविष्यात मोठ्या संधींची निर्मिती होणार आहे.
या बिझनेस हबमुळे कॉर्पोरेट ऑफिसेस, आयटी कंपन्या आणि इतर व्यावसायिक आस्थापना येथे येतील, ज्यामुळे हजारो नव्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
वाढलेली कनेक्टिव्हिटी...
निळजे ग्रोथ सेंटर
ऐरोली-काटई मार्ग
कल्याण-तळोजा मेट्रो लाईन
सिडकोचे खारघर येथील कॉर्पोरेट पार्क
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या परिसराची कनेक्टिव्हिटी अभूतपूर्व पातळीवर पोहोचेल, ज्यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक घडामोडींना मोठी गती मिळेल.
बुलेट ट्रेन, एकात्मिक वाहतूक केंद्र आणि बीकेसीपेक्षा मोठे बिझनेस हब यामुळे ठाणे जिल्हा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरचे एक महत्त्वाचे स्थानक बनेल, तसेच महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक नकाशावर एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.