
मुंबई (Mumbai) : ठाण्यातील (Thane) रस्ते दुरुस्तीसाठी ६०५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून मिळाला आहे. त्यातून शहरातील ११७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी महापालिकेचे (TMC) प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर खड्डा (Potholes) पडल्यास ठेकेदाराकडून (Contractor) चौरस मीटरनुसार एक लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
त्यासाठी टेंडरमध्ये (Tender) ठेकेदारांकडून १० वर्षे गॅरंटी लिहून घेण्यात आली आहे. तसेच रस्त्याचे काम समाधानकारक नसल्यास ठेकेदारांना बिले काढतानाही नाकीनऊ येणार आहेत.
पावसाळ्यात ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांनी केला असून कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. ठाण्यातील रस्ते दुरुस्तीसाठी ६०५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. त्यातून सर्व प्रभागांमधील सुमारे ११७ रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे. त्यामुळे जलद काम आणि दर्जा राखणे या दोन्ही आघाड्यांवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दर्जेदार काम केले तरच खड्डा दिसणार नाही. म्हणून रस्त्याचे काम दर्जेदार करणे हेच मुळामध्ये आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्ते कामांचा दर्जा वाढवण्यासंदर्भात सर्व ठेकेदारांना आणि प्रशासकीय यंत्रणेला ताकीद दिली गेली आहे. टेंडर भरताना तशी अटच घातली गेली आहे. त्यानुसार दहा वर्षांची गॅरंटी सर्वांनी मान्य केली आहे. यासंदर्भात आयुक्त बांगर म्हणाले की, दहा वर्षे या कालावधीत खड्डा पडणारच नाही याची मुख्य जबाबदारी ठेकेदारांवर असेल आणि दुर्दैवाने जर खड्डा पडलाच तर प्रत्येक चौरस मीटरमागे त्यांच्याकडून एक लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान दंडाच्या भीतीने रस्ते दुरुस्तीचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा असल्याचे बांगर यांनी सांगितले.
कामाचा दर्जा राखण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून आपल्यावरही असल्याचे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की रस्ते कामानंतर त्याच्या बिलाची फाईल टेबलावर आली की आपण स्वत: तेथे पाहणी करणार. काम समाधानकारक दिसले तरच बिल पास होईल. अन्यथा हे बील काढणाऱ्यापासून ते संबंधित अधिकारी, ठेकेदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
नुसत्या कारवाईच्या फार्सने ठाणेकरांना दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार नाही. त्यांना परत या त्रासातून जावे लागू नये यासाठी हा सर्व खटाटोप आहे. म्हणून नुसते अभियंता आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात काहीच अर्थ नाही, तसे करण्यात काही विशेष आनंदही होत नाही. पण ते सध्यातरी गरजेचे बनले असून ही वेळच ओढावू नये यासाठी सर्व यंत्रणेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
खड्डा का पडतो यामागे दोन-तीन प्रमुख कारणे आहेत. एक तांत्रिक कारण ज्याच्यामध्ये पाणी साठणे. एकाच ठिकाणी पाणी साठवून राहिले की तिथे खड्डा पडतो. डांबराच्या रस्त्यावर पाणी साचले की खड्डा पडणारच म्हणजे पाऊस पडल्यामुळे खड्डा पडत नाही तर पाणी साचल्यामुळे खड्डा पडतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने रस्ते बांधले जात आहेत.
दर्जाहीन काम झाल्यामुळे ही खड्डे पडतात. ही चूक सुधारणे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे दर्जाच्या बाबतीमध्ये संपूर्ण यंत्रणेला ताकीद दिली आहे. याशिवाय थर्ड पार्टी ऑडीटही करण्यात येणार आहे, असेही बांगर यांनी स्पष्ट केले आहे.