राज्यात प्रथमच महारेरा अंतर्गत विकासकावर फौजदारी गुन्हा; ठाणे जिल्हा प्रशासनाची कारवाई

MahaRERA
MahaRERATendernama

मुंबई (Mumbai) : राज्यात प्रथमच महारेरा कायद्यांतर्गत ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात विकसकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास हाईट्स या इमारतीमध्ये सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कैलास पाटील (६५) या विकासकावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे.

MahaRERA
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 'या' प्रकल्पाला कॅबिनेटचा ग्रीन सिग्नल! 'महाप्रित' करणार...

मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये विकासकांकडून गृह खरेदीदारांची आर्थिक फसवणूक करणे, त्यांना ठराविक वेळेत घराचा ताबा न देणे यांसारख्या घटना सातत्याने समोर येत असतात. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी सहा वर्षांपूर्वी महारेरा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. परंतु महारेराकडूनही ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे असतानाच, आता सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा प्रशासनाने विकासकावर कारवाई केली आहे.

MahaRERA
Nashik : अखेर एनएमआरडीएने चांदसी, संसारीला दिला पाच कोटी रुपये निधी

कळवा येथील सर्वे क्रमांक ४८/४ वर कैलास हाईट्स ही इमारत उभारण्यात आली आहे. या जागेचे मालक व विकासक कैलास छत्रपती पाटील यांनी कैलास हाईट्स मध्ये घर खरेदी केलेल्या नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एक कोटी ५२ लाखाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश मुंबईच्या महारेरा कार्यालयाने ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले होते. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या इमारतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. इमारतीमधील सर्व सदनिका ताब्यात घेण्यात आल्या होत्या. महसूल विभागाने त्यांचा लिलाव करून त्या लिलावापोटी एक कोटी ५३ लाख रुपये रक्कम वसुली करून त्याचे संबंधितांना वाटप करण्याचे निर्देश मुंबई महारेरा कार्यालयाने दिले होते.

MahaRERA
Mumbai : मुंबईतील हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय; बांधकामांच्या ठिकाणी 30 फुटांपर्यंत...

परंतु, वारंवार कैलास पाटील यांना संधी देऊन देखील त्यांनी महारेराच्या आदेशानुसार एक कोटी ५२ लाख रुपयाची रक्कम शासनाकडे जमा केली नव्हती. याउलट त्यांनी महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या सदनिका त्यांच्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या. अनेकदा ताकीद देऊनही त्यांनी रक्कम शासनास भरलेली नसल्याने आणि शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ठाणे तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यामार्फत कळवा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. महारेरा कायदा २०१६ च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी महारेरा अंतर्गत तातडीने कारवाई करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

महारेरा आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून संबंधित विकासकावर कळवा पोलीस ठाण्यात महारेरा कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

– युवराज बांगर, तहसीलदार, ठाणे 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com