500 कोटींच्या बुद्धभूमी धम्मकेंद्र आराखड्याला गती; स्वतंत्र प्राधिकरण करणार नियोजन

कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारणार
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatTendernama
Published on

मुंबई (Mumbai): कल्याण येथील चिकणघर परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यात असलेल्या विस्तीर्ण जागेचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

Sanjay Shirsat
द्वारका ते दत्तमंदिर 10 पदरी रस्ता 12 महिन्यांत अशक्य? 177 कोटींच्या टेंडरप्रकरणी कंत्राटदारांचे काय आहेत आक्षेप?

मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, बुद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी, सन्माननीय भन्ते, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगररचना विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील सुमारे १३.९६ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, या प्राधिकरणात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त, तसेच आनंदराज आंबेडकर, बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी यांचा समावेश असेल.

Sanjay Shirsat
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

बुद्धभूमी फाउंडेशनने तयार केलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या जागतिक बुद्धभूमी धम्मकेंद्र प्रकल्प आराखड्यात ६० मीटर उंचीची जागतिक बुद्धमूर्ती, ३२ मजली भगवान गौतम बुद्ध बहुउद्देशीय थीम भवन, महाबोधी महाविहाराची प्रतिकृती, विपश्यना केंद्र, भिक्खू-भिक्खुणी प्रशिक्षण केंद्र, चिल्ड्रेन होम, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, पशु-पक्षी चिकित्सालय, कायदेविषयक सल्ला केंद्र, व्यायामशाळा आणि राष्ट्रीय महापुरुषांची स्मारके प्रस्तावित आहेत.

विशेषतः सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल. सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि बौद्ध पर्यटन यांचा संगम घडवणारा हा प्रकल्प भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाचा नवा मानबिंदू ठरेल, असा विश्वास मंत्री शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकल्पाला आवश्यक प्रशासकीय गती देऊन विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले.

Sanjay Shirsat
Nashik: वर्षभरापूर्वी 19 कोटी खर्च केलेल्या सुस्थितीतील द्वारकाचौक ते नाशिकरोड रस्त्यावर 177 कोटींचे डांबरीकरण

सध्या या परिसरात बुद्धविहार, विपश्यना सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, इको पार्क, बौद्ध स्तूप, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, माता रमाई आंबेडकर स्मारक, धम्म परिषद मैदान, बोधीवृक्ष संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून विपश्यना शिबिरे, आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय धम्म परिषद यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या परिसरात अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण संकुल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृह, उद्यान, महिलांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण केंद्र, वृद्धाश्रम, ग्रंथालय, संगणकयुक्त अभ्यासिका आणि आध्यात्मिक व ध्यान केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

Tendernama
www.tendernama.com